नगर : महान्यूज लाईव्ह
महामारीच्या काळात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार भगवान शिरसाट यांच्या पथकाने अटक केली. या तिघाजणांकडून दोन चारचाकी वाहनांसह 88 पोती धान्य असा दहा लाख 44 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
राशीन कर्जत रस्त्यावर सागर हॉटेल समोर काहीजण शासकीय स्वस्त धान्य दुकानाचे धान्य घेऊन काळाबाजार करून त्याची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना तातडीने याची माहिती दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली यादव यांनी फौजदार शिरसाठ, हवालदार तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकडे यांचे पथक तयार करून करमाळ्याचे तहसीलदार समीर माने, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब सागळे, तलाठी प्रशांत गौडचर यांना याची माहिती दिली.
यानंतर सागर हॉटेल समोर आलेल्या बाळासाहेब दादासाहेब ढेरे, रेवणनाथ मुरलीधर ढेरे व श्रीकांत प्रकाश अहिरे (सर्व रा. वीट ता. करमाळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता हा सर्व धान्य स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे लक्षात आले. स्वस्त धान्य दुकानात आलेला तांदूळ आणि गहू नागरिकांना न देता काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी त्यांनी आणला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास फौजदार शिरसाठ करत आहेत.











