दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे 27 एप्रिलला एका सात वर्षाच्या मुलासह आईच्या खून करून आत्महत्येचा बनाव केलेल्या प्रकाराचा यवत पोलीसांनी फर्दाफाश केला. याप्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या पती आणि त्याच्या प्रेयसीला दौंड न्यायालयाने आज मंगळवारी ( दि.4 ) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, बायको घटस्फोट देत नसल्याने पतीने प्रेयसी आणि एका महिलेच्या मदतीने हे हत्याकांड केल्याचे तपासात समोर आले आहे. ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
पाटस येथील स्वराज व्हॅली अपार्टमेंटमध्ये सात वर्षाच्या मुलाचा आणि आईचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही आत्महत्या केली असे वाटावे अशा प्रकारचा बनाव आरोपींनी केला होता. मात्र यवत पोलीसांनी अवघ्या पाच तासांच्या आत ही आत्महत्या नाही, तर खून झाला असल्याचे तपासात उघड केले आणि या महिलेचा पती त्याची प्रेयसीला अटक केले.
त्यानंतर या दोघांना मदत करणारी एक अनोळखी महिला असल्याचे तपासात समोर आले. पोलीसांनी या अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीसांनी मयत लिना सोनवणे हिचा पती सचिन दिलीप सोनवणे आणि प्रेयसी रेणुका उर्फ प्रणाली भारत तळेकर यांना अटक करून 28 एप्रिलला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीसांनी सोमवारी (दि.3 ) आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयीने आपोरींच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ केली.
आरोपींना आज मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सध्या या दोन्ही आरोपींची दौंड येथील सबजेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे. लिना सोनवणे आणि तिचा पती सचिन सोनवणे यांच्यात काही वर्षापासून कौटुंबिग वाद होते. सचिन हा लिना हिच्या चारीत्र्यावर संशय घेत घटस्फोटाची मागणी करीत होता. मात्र लिना ही घटस्फोट देण्यास तयार होत नसल्याने सचिन याने प्रेयसी आणि एका अनोळखी महिलेच्या मदतीने लिनाचा खुन केला.
हा खून करताना सात वर्षाचा मुलगा ओम आणि दहा वर्षाची मुलगी वैष्णवी हिने पाहिले होते. आईला मारल्याचे ओम हा मामाला सांगणार असल्याने या आरोपींनी ओम याचाही गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले अशी माहिती पोलीसांनी दिली.











