दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील सरपंचवस्ती येथे काही दिवसापासून सुरू असेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. 76 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही माहिती दौंड पोलीसांनी दिली. आदर्श अनिल जाधव (वय 23,रा. गोवा गल्ली, दौंड) आणि स्वप्निल श्रीकांत रणदिवे (वय 29, रा. मीरा सोसायटी, दौंड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून शहरातील सरपंच वस्ती परिसरात बेकायदा ऑनलाइन जुगार चालू होता. याबाबतची माहिती पोलीसांना मिळल्याने पोलीसांनी सोमवारी ( दि 3 ) जुगार अड्यावर छापा टाकला.
या ठिकाणी अर्जुन शिंदे यांच्या मालकीच्या बंदिस्त गाळ्यामध्ये ऑनलाइन जुगार सुरू होता. आदर्श जाधव व स्वप्नील रणदिवे हे दोघेजण हा जुगार अड्डा चालवित असल्याचे निदर्शनास आले.
पोलीसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 76 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अशी माहिती पोलीसांनी दिली.











