इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सध्या महाराष्ट्रात महामारीने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सध्या समाजाला गरज कशाची आहे हे पाहून सामाजिक दृष्टीकोनातूनच वाढदिवस साजरे केले जावे,असे आवाहन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी केले आहे.
होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह पारेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वनविभागात प्राण्यांसाठीच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांमध्ये वन्यजीवांसाठी केली पाण्याची सोय करण्यात आली. त्यावेळी रेडके बोलत होते.
महेंद्र रेडके म्हणाले, युवकांनी आपल्या वाढदिवसाला होत असणारा वायफळ खर्चाला फाटा दिला पाहीजे. आज माणसाला, मुक्या प्राण्यांना गरज कशाची आहे हे पाहून दातृत्व स्वीकारणे गरजेचे आहे. समाजभावनेतून गोरगरीबांना तसेच प्राण्यांना केलेल्या मदतीतूनच खरा वाढदिवस साजरा केल्याचा आनंद मिळेल. केक, फुगे,आतिषबाजी अशा अनेक गोष्टीला बाजूला ठेवून पारेकरवस्ती येथील वनविभागात वन्यजीव व प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून प्राण्यांची तहान भागवली. ही वाढदिवसाची आठवण आयुष्यभर लक्षात राहील.
यावेळी धनाजी पारेकर, उपसरपंच पांडुरंग पारेकर, विक्रीकर निरीक्षक नवनाथ पारेकर, दत्ता पारेकर, व्हाईस चेअरमन दिपक पाटील, ग्रा.प.सदस्य प्रवीण पारेकर, सुहास पारेकर, भाऊसाहेब पारेकर, गणेश गुटाळ, राज पारेकर, आदित्यराज पारेकर, श्लोक पारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका वनअधिकारी राहुल काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.











