महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एखादी मोठी शक्ती ताकदवान असेल, तर आपल्या राक्षसी शक्तीचा वापर समोरच्या शत्रुवर करायचा प्रयत्न करते. अशावेळी समोरचा शत्रू संयम ठेवत असेल, तर विविधतेने नटलेला हा भारत आणि त्यातील राज्ये स्वतःची अस्मिता दाखवून देतात. एक वर्षापूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, वेळोवेळी सरकारची बदनामी केल्यानंतर देखील लोक थेट रोष दाखवत नाहीत आणि दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये अनेक महिने ठाण मांडून तृणमूल काँग्रेसला येनकेन प्रकारे त्रास देणाऱ्या भाजपला देखील स्वीकारत नाहीत. पश्चिम बंगालच्या अस्मितेने आम्हाला मोदी नको, आमची दीदी हवी हे मात्र दाखवून दिले.
प्रचंड मोठी ताकद लावून देखील पश्चिम बंगालमध्ये तेवढ्याच प्रचंड मोठ्या ताकदीने मतदारांनी ममता बॅनर्जींना अनभिषिक्त सम्राट बनवत इथे फक्त दिदीचीच जादू चालणार हे दाखवून दिले…! प्रचारादरम्यान दीड डझन केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राज्यांचे नेते यांनी तृणमूल काँग्रेसला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
एवढेच नाही तर भाजपचे चाणक्य, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रात ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला, तशीच अवस्था तृणमूल काँग्रेसची देखील पश्चिम बंगालमध्ये केली होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी बंगाली अस्मितेलाच प्राधान्य दिले. यानिमित्ताने देशात कोरोना च्या काळात भाजप सरकारने केलेल्या दुर्लक्षाला देखील सणसणीत चपराक देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या एककल्ली निर्णय प्रक्रियेला आव्हान दिले आहे.
देशातील लोकांचा कोरोनाशी लढा सुरू असताना केंद्र सरकार मात्र निवडणुकींना प्राधान्य देत होते ही टीका मतदारांच्या जिव्हारी लागली त्यांनी ती मतपेटीतून दाखवून दिली मात्र भाजपच्या नेत्यांना याची कुणकुण लागू नये हे मात्र जरा अतीच आहे. आज सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसची आघाडी जवळजवळ समसमान होती. त्यानंतर मात्र तृणमूल काँग्रेसने भाजपला प्रचंड मोठ्या अंतरावर सोडून दिले, मात्र दुपारपर्यंत सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी ज्या मतदारसंघातून लढत होत्या, त्या नंदिग्राम मध्ये स्थानिक नेते सुवेंदू अधिकारी यांनी बॅनर्जी यांना जोरदार टक्कर दिली. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी या मोठ्या मताधिक्क्याने पिछाडीवर होत्या, परंतु नंतरच्या फेऱ्यांमध्ये बॅनर्जी यांनी आघाडी घेतली आणि नंदिग्राम थोड्या फरकाने का होईना जिंकतील असे वाटले, परंतु दोन हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
निवडणुकीच्या अगोदर पश्चिम बंगालमधील आमदार खासदार यांना तृणमूल काँग्रेस मधून भाजप मध्ये घेण्याची भाजपने जी रणनिती अवलंबली होती आणि त्यातून तृणमूल कॉंग्रेसच्या अस्वस्थतेला हातभार लावला होता. ती अस्वस्थता मतदारांनी हेरत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शरद पवार यांना निवडणुकीपूर्वी युवकांनी प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील बंगाली मतदारांनी दिला असेच दिसून येते.
खरेतर दोन पंचवार्षिक निवडणुका ममता बॅनर्जी सत्तेत असल्यामुळे एक प्रकारची अँटीइकमबन्सी पश्चिम बंगालमध्ये राहील आणि त्यातून ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसेल असे चित्र सुरुवातीच्या काळामध्ये दाखवले गेले होते. प्रत्यक्षात भाजपने कडवे आव्हान उभे करून देखील व प्रचंड ताकद लावून देखील, ममता बॅनर्जींची ताकद भाजप कमी करू शकला नाही.
अर्थात काहीही म्हणायला गेले, तरी पश्चिम बंगालमध्ये ज्यांची अगोदर मक्तेदारी होती ते डावे आणि काँग्रेस यांचा मात्र सुपडा साफ झाला असून, विरोधकांची जागा आता भाजपने घेतली आहे. त्यामुळे विरोधाचे हिंदुत्व पर्व या ठिकाणी नव्याने सुरू होईल आणि भाजपला अनेक काळ प्रतीक्षा करायची तशी ही सवय आहे, त्यामुळे मिळालेल्या 80 जागा देखील भाजपसाठी खूप मोठ्या आहेत असे मानले तरी हरकत नाही. मात्र राक्षसी महत्त्वाकांक्षेचा या राज्यात तूर्तास तरी पराभवच झाला एवढेच आता म्हणता येईल.
या निवडणुकीत हिंदुंच्या मतांचे ध्रुवीकरण याचा भाजपने प्रयत्न केला, परंतु अगदी तुरळक जिल्ह्यांमध्ये याचा उपयोग झाला असे म्हणता येईल. मात्र एकूणच राज्यातील बंगाली मतदारांनी मात्र भाजपची देशातील सत्ता, त्यांचे वर्तन आणि राज्यांची अस्मिता यालाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले. भाजपला एकट्या ममता बॅनर्जी आव्हान देत आहेत, त्या एकाकी आहेत, त्या राज्याची अस्मिता आहेत आणि त्या एकटाच लढत आहेत, अशा वेळी नरेंद्र मोदी या महिला नेत्याचा उल्लेख हेटाळणी पूर्वक करत आहेत असे दिसत असल्याने मतदारांची सहानुभूती ममतांच्या बाजूने वाढली.











