पंढरपूर : महान्यूज लाईव्ह
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवलेली पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपने खिशात घातली आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 3 हजार मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीच्या निमित्ताने सहानुभूतीचे राजकारण कायमस्वरूपी चालत नाही आणि शेतकऱ्यांचा तळतळाट कोणाला सहन होत नाही हेच यातून स्पष्ट झाले.
पंढरपुर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना 1 लाख 4 हजार 271 मते मिळाली तर समाधान अवताडे यांना 1 लाख 7 हजार 774 मते मिळाली. पंढरपूरची निवडणूक राष्ट्रवादी आणि विकास आघाडीसह भाजपने देखील प्रतिष्ठेची बनवली होती. अवताडे आणि परिचारक हा मातब्बर गट होता, तर दुसरीकडे दिवंगत आमदार भारत भालके यांची सहानभूती आणि राज्यातील सत्ता हे राष्ट्रवादीची जमेची बाजू होती. हा मतदारसंघ भारत भालके यांनी खेचून आणला होता. त्यामुळे या मतदारसंघावर तशी राष्ट्रवादीची सत्ता होती.
कोरोनाच्या काळात देखील दहा हजार, पंधरा हजार लोकांच्या सभा मतदार संघात झाल्या. याच दरम्यान शेतीच्या वीज कनेक्शनचा प्रश्न आणि भाजपने केलेले कडव्या हिंदुत्वाचे मतांचे ध्रुवीकरण यादेखील बाबी भाजपसाठी जमेच्या ठरल्या. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतीच्या वीज कनेक्शनच्या विषयावरून शेतकऱ्यांच्या मनात महाविकासआघाडी विषयी रोषाचे बीज रोवत असताना, राष्ट्रवादी किंवा एकूणच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागू नये हे कोणालाच मान्य होणार नाही.
आता कोणाचे काय चुकले याचे आत्मचिंतन भलेही महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील, परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य शेतकरी महाविकास आघाडीच्या विरोधात गेले आहेत हे मात्र मान्यच करावे लागेल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंदापूरचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची या निवडणुकीसाठी कसोटी लागली होती. आता या निकालामुळे इंदापूर तालुक्यातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांना भरणे यांच्या विरोधात लढण्यासाठी व भरणे यांना घेरण्यासाठी जमेचे पाठबळ मिळाले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, जे भाजपने सत्तेच्या काळात पाच वर्ष सूत्र राबवले, तेच मा विकास आघाडीने अवघ्या एका वर्षात सामान्य नागरिक सोशल मीडियावरील नेटकरी आणि पत्रकारांच्या बाबतीत राबवले. शेतकऱ्यांना गृहीत धरत वीज बिलाच्या बाबतीत जी अधिकारवाणी महाविकास आघाडीने केली, शेतकऱ्यांचे विद्युत रोहित्रे जबरदस्तीने सोडवली. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात शेतीतील उत्पन्न घसरलेल्या शेतकऱ्यांना विज बिल भरण्यास शिवाय पर्याय उरला नाही. त्याचा प्रचंड रोष शेतकऱ्यांच्या मनात होता. तो या निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मतपेटीच्या माध्यमातून उतरवला.
या निवडणुकीमुळे अकलूजच्या मोहिते पाटलांचे वजन पुन्हा एकदा भाजपमध्ये वाढले, तर परिचारक गट फुटला नव्हता हे देखील यातून सिद्ध झाले. राज्यात सत्ता असूनदेखील महाविकास आघाडी आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरे गेली नाही, किंबहुना ग्राउंड वरील परिस्थिती वेगळी होती हे यातून दिसून आले.











