मुंबई : महान्यूज लाईव्ह
मनसुख हरेन यांच्या हत्या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यावरून गृहमंत्रीपद अन्य मंत्र्यांकडे देण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र मंत्रीमंडळात कोणताही खांदेपालट होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे हसमुख हरेन प्रकरणात गृहमंत्री बदलणार असल्याच्या वावड्या उठवण्यात अर्थ नाही. पक्षात असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार हे ठाम मताचे आहे. त्यामुळे कोणी काही चुकत असेल तर त्याला त्यांची शिक्षा व्हायलाच हवी असे या सरकारचे धोरण आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का या प्रश्नावर बोलताना वाझे प्रकरणात गृहमंत्र्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.











