शेतीमध्ये ‘अर्जुना’चा लक्ष्यवेध..!
बारामती : महान्यूज लाईव्ह
समस्या आणि संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत..पण म्हणून शेतकरी काही थांबलेला नाही.. तो थांबत नाही आणि कुढत बसत नाही.. तो लढतो..मग कधी जिंकतो, तर कधी हरतो.. कोरोनाच्या समस्येनं शेतकर्यांचा खिसा रिकामा केला.. पण काटेवाडीचा एका शेतकऱ्याने एका एकरात तब्बल 121 टन उसाचे उत्पादन घेत जिगर काय असते ते दाखवून दिले…
काटेवाडीतील अर्जुन मासाळ या शेतकऱ्याचा ऊस आज छत्रपती सहकारी साखर कारखाना साठी तुटला. यामध्ये एका एकरामध्ये 121 टन ऊस भरला. चार फुटी अंतरावर लागवड केलेला फुले 265 जातीचा हा ऊस पहिल्यांदाच मासाळ यांनी ठिबक सिंचनावर घेतला पाण्याचा योग्य व्यवस्थापनाने व खताच्या दुप्पट मात्रेने दरवर्षी ज्या शेतामध्ये वजा मातीमध्ये 60 ते 65 मेट्रिक टन प्रति एकर ऊस निघतो तिथे यावर्षी 121 टन भरला. म्हणजे जवळपास दुप्पट उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
जवळपास 47 ते 48 सरासरी कांड्या उसाला निघाल्या. वीस ते पंचवीस फुटापर्यंत उसाची लांबी काही ठिकाणी दिसून आली. सांगली जिल्ह्यामधील प्रगतशील ऊस उत्पादक संजीव माने यांनी शंभराहून अधिक शेतकऱ्यांचे अनेक ग्रुप बनवले आहेत. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा देणारे सरकार अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयोग व त्याचे अनुकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणार का हा खरा प्रश्न आहे.
पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष राज्य साखर संघ : शेतकरी जिगरबाज आहेत. शेतकरी कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन घेऊ शकतात, अशा प्रयोगाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.आज वर्षानुवर्षे उसाची शेती घेण्यामुळे जमिनींचा पोत कमी झाला आहे. अशा परिस्थितीत जमिनींचा पोत वाढून उसाचे अधिकाधिक उत्पादन घेणे हेच उत्पादकांसाठी लाभदायक ठरणार आहे. काटेवाडीतील अर्जुन मासाळ यांच्याप्रमाणेच अनेक शेतकरी उसाचे उत्पादन वाढवून घेत आहेत या अतिशय कौतुकाची बाब आहे.











