बारामती : महान्यूज लाईव्ह
शहरातील रिलायन्स मॉल मध्ये मूळ उत्पादकाच्या अवेष्टित उत्पादनावर बाह्य किंमत टाकल्याबद्दल वैधमापन शास्त्र निरीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 च्या कलम 18( 1) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 36 अन्वये दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात मॉलला नोटीस दिली असून आठवड्यामध्ये याचे उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे.
बारामतीतील रिलायन्स मॉल मध्ये वस्तूच्या मूळ उत्पादकाच्या किमती व्यतिरिक्त स्टिकर द्वारे किंमत टाकल्या जात असल्या संदर्भात ग्राहक संरक्षण परिषदेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. एमआरपी पेक्षा वेगळे स्टिकर लावले जात असल्याची तक्रार ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य एडवोकेट तुषार झेंडे यांच्याकडे करण्यात आली होती. सर्फ एक्सेल या कपडे धुण्याच्या पावडरच्या पुढे वरती 48 रुपये बचत असे लिहून तीनशे रुपये किंमत दाखवली होती, प्रत्यक्षात संबंधित ग्राहकाकडून 345 रुपये 50 पैसे एवढी किंमत आकारली. त्यावरून झेंडे यांनी याबाबत वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या सहाय्यक नियंत्रक पुणे जिल्हा यांच्याशी संपर्क करून तात्काळ कारवाई करण्याबाबत त्यांना कळविले.
त्यावरून आज वैधमापन शास्त्र निरीक्षक बारामती यांना समक्ष घेऊन झेंडे, ग्राहक पंचायतीचे दिलावर तांबोळी यांनी भेट दिली. अधिकाऱ्यांनी रिलायन्स मॉल या ठिकाणी तपासणी केली असता याच्या व्यतिरिक्त गहू या उत्पादनाच्या आवेष्टित वस्तू अधिनियमान्वये वस्तूवरील कमाल विक्री किंमत बाबत संबंधित वस्तू दोषी आढळून आल्या. त्या सर्व जप्त केल्या असून त्याबाबत मेमो, तपासणी प्रतिवेदन रिलायन्स स्मार्ट बारामतीच्या व्यवस्थापकास दिला.
आठ दिवसांमध्ये याचा दंड न भरल्यास बारामती न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान झेंडे यांनी सांगितले की, ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दिवाळीच्या सणानिमित्ताने खरेदी करताना वस्तूचे एक्सपायरी डेट, एम आर पी, खाडाखोड करणे, स्टिकर चिटकवणे इत्यादी बाबी आढळून आल्यास तात्काळ त्याचा आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून, संबंधित दुकानाचा फोटो काढून, बिलाचा फोटो काढून हे फोटो वैध मापन शास्त्र यंत्रणेचे राज्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी व्हाट्सअप नंबर 98 69 69 1666 यावर तक्रार पाठवावी. याबाबत तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल. अथवा याचा पाठपुरावा केला जाईल.











