बारामती : महान्यूज लाईव्ह
स्वादुपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या इंदापूर तालुक्यातील रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी मृताच्या नातेवाइकांनी बारामतीतील दवाखान्यात येऊन डॉक्टरांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी देखील दिली. बारामतीत वाढत असलेल्या या प्रकाराने डॉक्टर चिंतेत आहेत.
काही दिवसांपूर्वी शहरातील कोरोनावर उपचार करणाऱ्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये मृताच्या नातेवाइकांनी डॉक्टरांवर हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी व डॉक्टरांनी देखील नरमाईचे धोरण स्वीकारले होते, परंतु उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत जामीन मागणाऱ्या आरोपीस एक लाखाचा दंड ठोठावला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा डॉक्टरांना धमकावण्याचे प्रकार होत असल्याने या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काल रात्री शहरातील चैतन्य दवाखान्यातील डॉक्टर शशांक जळक यांच्या दवाखान्यामध्ये हा प्रकार घडला. डॉक्टर जळक यांच्याकडे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील एक रुग्ण स्वादुपिंडाच्या विकाराने उपचारासाठी दाखल झाले होते. या जेष्ठ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाइकांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती, मात्र तीन दिवसानंतर एका युवकाने येऊन या रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी जाब विचारत डॉक्टरांना शिवीगाळ केली. दवाखाना जाळून टाकण्याची धमकी दिली, तसेच डॉक्टरांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. येथील कर्मचाऱ्यांनाही त्यांनी शिवीगाळ केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात डॉक्टरांनी बारामती शहर पोलीस ठाण्याकडे तक्रार केली, यावेळी डॉक्टरांच्या संघटनेचे पदाधिकारी पोलिस ठाण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने या पदाधिकाऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना संपर्क साधला, तेव्हा आमची कोणतीही तक्रार नसल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात डॉक्टर मात्र
याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. समाजकंटकांना धडा न बसल्यास बारामतीतील आरोग्य वातावरण बिघडेल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.










