बारामती : बारामती नगरपरिषदेने समस्येवर तोडगा काढण्याऐवजी थेट पारंपरिक आठवडा बाजारच बंद करण्याचा अनाकलनीय आणि शेतकरीविरोधी निर्णय घेतला आहे. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांचे सुयोग्य पुनर्वसन करणे आणि वाहतुकीला शिस्त लावणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी असताना, प्रशासनाने मात्र थेट बळीराजाच्या पोटावरच लाथ मारली आहे. ‘डोके दुखते म्हणून डोकेच छाटून टाकण्याचा’ हा प्रकार असून, या मनमानी कारभाराला चोख उत्तर देण्यासाठी बारामती आणि पंचक्रोशीतील शेतकरी गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषदेवर भव्य धडक मोर्चा काढणार आहेत.
बारामती शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भरणारा आठवडा बाजार हा केवळ खरेदी-विक्रीचे ठिकाण नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी ग्राहकांमधील एक मजबूत दुवा आहे. परिसरातील शेतकरी स्वतःच्या शेतात रात्रंदिवस राबून पिकवलेला ताजा, विषमुक्त भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैशांचा हक्काचा नफा मिळतो, तर नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात भाजीपाला उपलब्ध होतो. मात्र, शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याचा ठपका ठेवत पालिकेने थेट बाजारच बंद पाडला. रस्त्यावर शिस्तबद्ध व्यवस्था करणे, विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेत बसवणे किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देणे शक्य असतानाही, प्रशासनाने शेतकऱ्यांचे कष्ट धुळीस मिळवणारा सोपा मार्ग निवडला आहे.
प्रशासनाच्या या आडमुठ्या आणि असंवेदनशील भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार असून, शेतकऱ्यांचे शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. कष्टाचा हा घोर अपमान शेतकरी बांधव कदापि सहन करणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा आता दिला जात आहे. आठवडा बाजार बंद करण्याऐवजी योग्य वाहतूक नियोजन करा आणि शेतकरी-ग्राहकांचे हित जपा, अशी ठाम भूमिका घेत पंचक्रोशीतील शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजता बारामती नगरपरिषदेसमोर धडकणाऱ्या या भव्य मोर्चात शेतकरी आणि सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










