विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर : सोमेश्वर परिसरातील तिसऱ्या पिढीतील गुणवंत डॉक्टर डॉ. अजिंक्य शहा यांची दिल्ली येथील नामांकित दिल्ली बेस आर्मी येथे एम एस पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशामुळे सोमेश्वर नगरचे नाव दिल्लीत झळकले आहे.
करंजेपूल, सोमेश्वरनगर येथील स्वर्गीय डॉ. सुभाष शहा व श्रीमती सविता सुभाष शहा यांचे नातू तसेच डॉ. सचिन शहा व डॉ. सीमा सचिन शहा यांचे सुपुत्र असलेले अजिंक्य शहा यांनी ऑल इंडिया स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत एम. एस. शिक्षणासाठी दिल्लीतील बेस हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला आहे. परिसरातून अशा प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवणारे ते एकमेव विद्यार्थी ठरले आहेत.
अजिंक्य यांना लहानपणापासूनच शिक्षणाची विशेष आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठान येथे झाले. त्यानंतर त्यांनी डी वाय पाटील कोल्हापूर येथून एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच ठाम ध्येय निश्चित केले होते. नीट पीजी परीक्षेची काटेकोर तयारी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी ऑल इंडिया कोट्यातून दिल्ली येथे प्रवेश मिळवला.
शहा कुटुंबाची ही वैद्यकीय सेवेतली तिसरी पिढी आहे. आजोबा, वडील आणि आता अजिंक्य अशा तिन्ही पिढ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा जोपासत आहेत. कुटुंबातील संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि मित्रपरिवाराची साथ यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. अजिंक्य यांच्या या यशामुळे सोमेश्वर परिसरात उत्साहाचे वातावरण असून भविष्यात ते वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाची सेवा करतील,असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.











