सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
एखाद्या गावचा सरपंच किंवा एखाद्या कारखान्याचा अध्यक्ष करण्यासाठी एखादा मंत्री प्रतिष्ठा पणाला लावू शकतो हे एव्हाना सर्वांनाच माहिती आहे… पण आपल्या वर्गमित्राचे सोसायटीचे अध्यक्षपद अगोदर ठरल्यानंतरही मिळू शकले नाही, म्हणून त्याच्या अध्यक्षपदासाठी खुद्द राज्यमंत्री लक्ष ठेवून असल्याचे उदाहरण इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळाले. अखेर त्यांचा वर्गमित्र सोसायटीचा अध्यक्ष झालाच..!
इंदापूर तालुक्यातील सणसर येथील सणसर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी संस्थेचे संचालक वसंतराव जगताप यांची आज बिनविरोध निवड झाली, या संस्थेच्या अध्यक्षपदाची खुर्ची सहा महिन्यांची असते. मागील काही वर्षांपासून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी ही प्रथा या संस्थेत सुरू असून दर सहा महिन्याला या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होत असते.
मागील काही महिन्यांपूर्वी जगताप यांचा अध्यक्षपदासाठी ठरल्यानुसार दावा होता. परंतू अचानकच काहीतरी बिनसले आणि सोसायटीच्या निवडणूकीत प्रथमच संचालकांनी ठरल्यापेक्षा वेगळाच अध्यक्ष निवडला. अमोल भोईटे हे संस्थेचे अध्यक्ष बनले. मात्र त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा सारे काही सुरळीत झाले आणि संस्थेचे मावळते अध्यक्ष अमोल भोईटे यांनी वसंतराव जगताप यांच्यासाठी पदाचा राजीनामा दिला आणि रिक्त पदावर जगताप यांची आज बिनविरोध निवड झाली.
अर्थात जगताप यांची निवड ही औपचारिकता होती. मात्र तरीही त्यासाठी खुद्द राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचेही लक्ष त्या निवडीकडे होते. भरणे यांनी गावातील पदाधिकाऱ्यांना यासंदर्भातील माहिती देताना वसंतराव अध्यक्ष झाला पाहिजे, त्यासाठी हवी ती मदत करा व यासंदर्भात सर्वांचे एकमत होईल याकडे लक्ष द्या अशी सूचना केली होती अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
आज ही निवड बिनविरोध झाली. यावेळी सणसरचे सरपंच रणजितसिंह निंबाळकर, छत्रपतीचे संचालक दिपक निंबाळकर, संस्थेचे संचालक दिलीप भोईटे, अशोक काळे, सणसरचे माजी सरपंच विजयसिंह निंबाळकर, माजी उपसरपंच शिवाजी रायते, रविंद्र भोईटे, मालोजीराव गायकवाड, विजय पाटील, विक्रमसिंह निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, सागर भोईटे, अॅड. विलास खटके, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, हेमंतराव निंबाळकर, मारूती निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ, श्रीनिवास कदम, सोमनाथ जगताप, परशुराम रायते, पार्थ निंबाळकर, सिध्दार्थ जाचक, शब्बीर काझी, विजय चव्हाण, मारुती शिंदे, सोमनाथ गुप्ते, सत्यजित काळे, सोमनाथ जगताप आदी पदाधिकारी व संस्थेचे संचालक उपस्थित होते.
सणसरमध्ये आज कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान
दरम्यान आज सणसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन निवडीदरम्यान भवानीनगर पोलीस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार प्रभाकर बनकर यांच्या सेवानिवृत्तीसंदर्भात सणसर सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हेही उपस्थित होते. कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिलीप पवार यांचाही सणसर सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला











