वालचंदनगर : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कृष्णा शिवाजी कांबळे याला दुचाकी चोरीचा जणू छंदच जडला होता.. वालचंदनगरच्या हद्दीमध्ये एक दुचाकी चोरीला गेली आणि ती शोधताना वालचंदनगर पोलिसांनी त्याच्याकडील अख्खं घबाडच शोधून काढलं.. इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात त्याने तब्बल दहा दुचाक्या चोरल्या होत्या. वालचंदनगर पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.
16 फेब्रुवारी रोजी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेचर डिलाईट डेअरी या दुग्ध प्रकल्पातून एक दुचाकी चोरीला गेली. त्याची नोंद पोलिस ठाण्यात झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार अतुल खंदारे यांना आणि वालचंदनगर पोलिसांना सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार अतुल खंदारे यांचे विशेष पथक नेमले व त्याद्वारे दुचाकी चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
भवानीनगर, भिगवण, जंक्शन, कळस आदी भागांमध्ये रात्रगस्त द्वारे चोरट्यांचा शोध सुरु झाला. शोध घेता घेता गोपनीय बातमीदाराने चोरट्यांसंदर्भात माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी कृष्णा कांबळे यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याने सुरवातीला ताकास तूर लागू दिला नाही. अखेर पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवला आणि मग मात्र कृष्णा पोपटासारखा बोलू लागला.
त्याने भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक, वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक आणि इतरत्र तीन अशा दहा दुचाक्या चोरल्याचे कबूल केले. तुम्ही अजूनही मोटरसायकली चोरल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.











