बिरोबावाडी येथे टँकरची दुचाकीला धडक
दौंड : महान्यूज लाईव्ह
पाटस ते दौंड राज्यमार्गावर बिरोबीवाडी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. पाटसकडून दौंडकडे निघालेल्या दुचाकीला टँकरची धडक बसल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. हे दोघे पती पत्नी परांडा तालुक्यातील गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी जात असताना बिरोबावाडी येथे हा अपघात झाला.
कावेरा मनोहर देडगे ( वय 55 रा.खाचापुरी ता.परांडा जि.उस्मानाबाद,सध्या रा.बालेवाडी पुणे ) असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिलेचे पती मनोहर देडगे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर यवत येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज गुरूवारी ( दि.14 ) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाटस दौंड राज्य मार्गावरील बिरोबावडी येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुलावर हा अपघात झाला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार देडगे दांपत्य अॅक्टीवा या दुचाकीवरून (क्र. एम.एच.12,आर,जे.2707) पाटसकडून दौंडकडे जात होते. त्यावेळी समोरील बाजूने दौंडकडून पाटसकडे जाणाऱ्या टॅंकरने ( क्र. एन,एल 01,ए,डी.6294) दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिला टँकरच्या टायरखाली चिरडून गंभीर जखमी झाली. तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर या महिलेचे पती मनोहर देडगे हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टॅंकरचालक पसार झाला असून टॅंकर पोलीसांना ताब्यात घेतला
आहे. पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे प्रदीप काळे हे करीत आहेत.











