दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलजवळ दुचाकीच्या डिक्कीतील ८७ हजार रुपये आणि दुचाकी घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटला आहे. ही चोरी करताना चार अज्ञात चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. दरम्यान, याबाबत दौंड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धनंजय साळुंखे (वय ४२,रा. मळद, ता.दौंड) यांनी या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनाला फिर्याद दिली आहे. दुचाकी (क्र. एमएच ४२ ए वाय २८८२) ही दुचाकी धनंजय साळुंखे यांनी त्यांचे भाचे अक्षय वाघमारे (रा. कुंभार गल्ली, दौंड) यांना वापरावयास दिली होती. अक्षय हा गुरुवारी (दि.१३) रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन दौंड पोलीस स्टेशनच्या परिसरात गेला होता. यावेळी त्याने दुचाकी हॉटेलसमोर हँडल लॉक करून उभी केली. काही वेळाने परतल्यानंतर त्याला आपली दुचाकी दिसली नाही.
आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळत नसल्याने शेवटी त्याने पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी तक्रार करून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये हा चोरीचा प्रकार कैद झाला आहे. विशेष म्हणजे, पोलिस ठाण्याच्या आवारातच भर दिवसा हा चोरीचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.











