महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फॉर्म भरणाऱ्यांच्या गर्दीमुळे सर्व्हर डाऊन होऊन अर्ज भरण्यास विलंब होत आहे, या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 29 व 30 डिसेंबर या दोन्ही दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन जात पडताळणीचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. म्हणूनच आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
आज यासंदर्भात मुंडे यांनी ट्विटरवर माहिती दिली. यामध्ये अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.











