इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यामध्ये स्थापन झालेले महाआघाडीचे सरकार हे अनैसर्गिकरित्या स्थापन झालेले सरकार आहे. एवढे बेफिकीर,संवेदनाहीन आणि निष्क्रिय सरकार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ही विधानपरिषदेची निवडणूक आहे असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी इंदापूर येथे केले.
इंदापूर येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार व पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात दरेकर बोलत होते. यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
दरेकर म्हणाले,’ संग्रामसिंह देशमुख आणि जितेंद्र पवार जिंकून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल अटळ आहे. तो पायगुण या दोन्ही उमेदवरांच्यात आहे. केवळ जितेंद्र पवार किंवा संग्राम देशमुख आमदार बनणार एवढ्यापुरती ही निवडणूक सिमित नसून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दिशेने आणि भविष्याच्या दृष्टीने दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. आज राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न,शेतकरी आत्महत्या, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार,अतिवृष्टीची नुकसान भरपाई व वीज बिलासारखा ज्वलंत प्रश्न असताना सरकारकडे मात्र हे विषय समजून घ्यायला वेळ नाही.पाच वर्षात देवेंद्र फडणीस यांनी या राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला. फडणवीस सरकारच्या काळामध्ये विनाअनुदानित शाळांना मदत करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र आजच्या सरकारचा संपूर्ण वेळ केवळ आणि केवळ बदल्या करण्यामध्ये चालला आहे. म्हणून पदवीधरांनी आणि शिक्षक मतदारांनी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करून दोन्ही उमेदवार निवडून द्यावे.’
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यामध्ये 10 हजार 861 पदवीधर मतदार आहेत तर 1208 शिक्षक मतदार आहेत. सरकारच्या एक वर्षाच्या निष्क्रिय कारभारानंतर आलेली ही पहिली निवडणूक असून इंदापूर तालुक्याने या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना विजयी करून महाराष्ट्राला या निवडणुकीच्या माध्यमातून संदेश देण्याची गरज आहे.
यावेळी आमदार राहुल कुल, तानाजी थोरात, सुभाष माने, अविनाश मोटे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी व आभार भाजपाचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.










