कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : महान्यूज लाईव्ह
वर्षानुवर्षे नागपूरमध्ये होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणार आहे. ७ डिसेंबरपासून हे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे. याबाबत आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
७ डिसेंबर २०२० पासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे, या पार्श्वभूमीवर आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. निलम गोऱ्हे, नरहरी झिरवाळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, परंतु सध्या असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.











