इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वडापूरी येथील दहा हजार रुपये किंमतीची शेळी चोरट्यांनी दरोडा टाकून चोरून नेल्याची घटना काल रविवारी (दि.8) मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. शेळी मालकाच्या प्रसंगावधानाने चोरट्यांना इतर शेळ्यांची चोरी करता आली नाही. मात्र शेळ्या चोरीसाठी चोरट्यांनी मोटारसायकल व रिक्षाचा वापर केला, त्यामुळे दुचाकीच्या क्रमांकामुळे चोरटे ताब्यात आले.शेळ्या चोरी प्रकरणातील सात पैकी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एकजण फरारी आहे.
इंदापूर पोलिसांनी आज दुपारी यातील निलेश सोड्डे, राहुल पवार, अभिजीत ननवरे, सुदर्शन धनाने, रवि वायकर व आकाश लोंढे या सहा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने बुधवार 11 तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत केशव गणपत माने (रा.वडापुरी ता.इंदापूर जि.पुणे) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेळ्या चोरणा-या टोळीस इंदापूर पोलीसांनी काल रविवारी पकडून त्यांच्याकडून त्यांनी चोरलेल्या शेळ्या सह चोरण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकल व एक रिक्षा पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
इंदापूर तालुक्यातील वडापूरी गावातील केशव गणपत माने यांना रविवारी (दि.8) मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर कुत्री भुंकल्याचा व शेळ्या ओरडल्याचा आवाज आल्याने ते घराबाहेर आले. त्यांनी बॅटरी लावुन पाहिल्यावर घरासमोर असलेल्या छपराच्या गोठ्यात पाच अनोळखी इसम चार शेळ्यांपैकी एक शेळी सोडत असताना पाहिले. त्यांनी कोण आहे? असा आवाज देताच त्यांनी केशव माने यांची दहा हजार रुपये किंमतीची शेळी रिक्षात टाकली. रिक्षामध्ये एक जण व दोन मोटरसायकलवर चौघेजण बसले.
केशव माने यांनी त्यांची शेळी घेवुन जात असताना चोरट्यांच्या मागे पळाले, तेव्हा मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेल्या एका इसमाने केशव माने यांना पायाने लाथ मारुन खाली पाडले. या वेळी माने यांनी चोरट्यांकडील मोटारसायकल चा नंबर एम एच 45 एम 1783 असल्याची फिर्याद वरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित जाधव यांनी कामगिरी बजावली.
इंदापूर पोलिसांनी शेळ्या चोरीच्या आरोपावरुन निलेश जगदीश सोड्डे उर्फ भंडारी (वय 21 रा. राजवडी ता.इंदापूर), राहुल बाळासाहेब पवार (वय 22 रा. बाबा चौक, इंदापूर, ता.इंदापूर), अभिजीत सुभाष ननवरे (वय 19 रा.इंदापूर), सुदर्शन शिवदास धनाने (वय 19 रा. मुरुम ता.उमरगा जि.उस्मानाबाद सध्या रा.इंदापूर ता.इंदापूर), रवि देविदास वायकर (वय 22 रा.विजयचौक, अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर) आकाश संतोष लोंढे (वय 21 रा. विजयचौक, अकलूज ता.माळशिरस), आकाश राऊत (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांना ताब्यात घेवून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी निलेश सोड्डे, राहुल पवार, अभिजीत ननवरे, सुदर्शन धनाने या आरोपींना काल रविवारी 10 वाजून 59 मिनिटांनी अटक करण्यात आली. आरोपी रवि वायकर व आकाश लोंढे यांना आज सोमवारी (दि.9) 1 :42 वाजता अटक करण्यात आली, तर आरोपी आकाश राऊत हा फरारी आहे.
इंदापूर पोलीसांनी सदरहू चोरी गेलेली फिर्यादीने दिलेल्या वर्णनाची व तिच्या गळ्यात असणा-या घंटी व भगव्या पिवळ्या रंगाच्या माळ घातलेल्या शेळी ताब्यात घेतली. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एम एच 45 एम 1783 व रिक्षा (आर टी ओ क्रमांक एम एच 23 एफ 2874 )जप्त केली आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव पुढील तपास करत आहेत.











