इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर गावचे हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील ऊसतोड कामगार जागीच मृत्यू झाला.
गोपाळ सुरेश खरात(वय २० वर्षे रा. पलसखेडा ता.जामनेर जि.जळगाव) असे अपघात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी (दि.८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुकुंदा महादेव गोफणे (वय ३२ वर्षे, सध्या रा माळवाडी नं.२ गार्डेवस्ती ता.इंदापूर, मूळ रा गोंदवाडी, ता.बोदड जि. जळगाव) यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी गोफणे हा माळवाडी नं.२ येथे बापजी मुरलीधर गार्डे यांचेकडे इतर उसतोड मजुरासह उसतोडणीचे काम करतो. त्याचा मेहुणा गोपाळ सुरेश खरात आपल्या पत्नीसह फिर्यादीबरोबर उसतोडणीचे काम करतो. रविवारी (दि.८) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोपाळ खरात हा टोळीचे मुकादम हनुमंत रामचंद्र व्यवहारे (रा.पोंदकुलवाडी,ता. इंदापूर) यांच्या मालकीची बजाज कंपनीची दुचाकी (क्र.एम एच १६ बी एक्स ६५२२) घेवून खेड (ता.राशीन,जि.नगर) येथे आई वडीलांची भेट घेण्यासाठी गेला होता.
तेथून इंदापूरकडे परतताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याने मुकादम व फिर्यादीची पत्नी यांना तसे सांगितले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुकादम व्यवहारे यांना त्यांच्या फोनवर गोपाळ खरात याचा लोणी देवकर गावच्या हद्दीत पुणे ते सोलापुर महामार्गावर,पुण्याकडून सोलापूरकडे जाणा-या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याचा निरोप आला. मृतदेह इंदापूर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.
त्यानंतर गोफणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात जावून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात, अविचाराने रस्ता वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन चालवून गोपाळ चालवत असलेल्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरला अश्या आशयाची तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन ठाणे अंमलदार दीपक पालके यांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला. फौजदार सुशील लोंढे पुढील तपास करत आहेत.










