इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील गागरगावच्या हद्दीतील कदमवस्ती येथे रविवारी सकाळी अज्ञात कारणावरुन एका बारा वर्षीय मुलीने राहत्या घरात बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिवनेरी नितिन गटकूळ असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. शिवनेरीचे वडील नितिन राजाराम गटकुळ (वय ३५, रा.गागरगांव, कदमवस्ती) यांनी या संदर्भात इंंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
ठाणे अंमलदार दीपक पालके यांनी दिलेल्या माहितीनुसार नितिन गटकूळ हे बिजवडी येथील साखर कारखान्यामध्ये काट्यावर क्लार्क म्हणून नोकरी करत असून, शेतकरी कुटुंबातील आहेत. आज पहाटे चार वाजता गटकूळ आपल्या नोकरीच्या ठिकाणी गेले होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणा-या अर्जुन चव्हाण यांचा त्यांना फोन आला.
शिवनेरी हिने रहाते घरातील बाथरुममध्ये गळफास घेतला आहे. तिला घेवून आपण इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात निघाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर गटकूळ रुग्णालयात पोहोचले. दरम्यान डॉक्टरांनी शिवनेरी हिला तपासणी दरम्यान मृत घोषित केले. तिच्या मृत्यू चे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.










