सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर अधिकारी निर्लज्जपणे म्हणतात कि मंत्र्यांचं काम असतं बोलायचं आपण फक्त ऐकायचा आणि सोडून द्यायचं त्यामुळेच इंदापुरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रस्त्याचे खड्डे भरून काढण्याचे आदेश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी भरणे यांनाच कात्रजचा घाट दाखविला आहे. इंदापूर तालुक्यात रस्ते दुरुस्तीची देशमुखी एका ठेकेदाराला दिले, तर त्याने खड्डे भरून काढण्याऐवजी नवीन खड्डे तयार होतील अशीच कामगिरी केली.
मध्यंतरीच्या महापुरानंतर इंदापूर तालुक्यातील रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले त्यानंतर बांधकाम विभागाने आपली चापलुसी करणाऱ्या ठेकेदारांना एक काम दिले. मात्र एका ठेकेदाराने बर्यापैकी काम केले, तर दुसऱ्या ठेकेदाराने पुन्हा खड्डे कसे होतील अशा स्वरूपाचे काम केले. विश्वास बसत नसेल तर काटेवाडी पासून जिथून इंदापूर तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द सुरू होते, तिथपासून ते बेलवाडी पर्यंत कोणीही रस्ता पहावा, त्यांना याची प्रचीती येईल.
इंदापूर तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाच्या दारात अनेक अपघातास निमंत्रण ठरणारा खड्डा बुजवता येत नसेल तर तालुक्यातील खड्डे काय बुजवणार असा सवाल नागरिकांमधून होत असून, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वेळोवेळी खड्डे बुजवण्याच्या दिलेल्या आदेशाचे पालन बांधकाम विभागाचे अधिकारी करत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान इंदापूर तालुक्यातील खड्डे बुजवण्याची मागणी करत राज्यातील आघाडी पक्षाचा घटक असणाऱ्या काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उदासीन ते बद्दल नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला. अधिकाऱ्यांना अजून किती अपघात होणे बाकी आहे? त्यानंतर हा रस्ता होईल असा प्रश्न विचारत तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री भरणे हे इंदापूर शासकीय विश्रामधाम मध्ये अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकांमध्ये अनेक वेळा रस्ते तातडीने दुरुस्त करा खड्डे बुजवा अशा सूचना तसेच आदेश देऊनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसत आहे.
निमगाव केतकी येथे गेल्या आठवड्यामध्ये अकलूजच्या दांपत्याचा मोटर सायकल खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. इंदापूर बारामती रस्त्यासारखीच इंदापूर अकलूज रस्ता त्याचीही तशीच अवस्था आहे. वास्तविक पाहता अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्या कडे राज्य मंत्र्याच्या आदेशाचे तात्काळ पालन करणे गरजेचे होते, मात्र इंदापूर बसस्थानकासमोर असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तालुका कार्यालयासमोर पुणे सोलापूर हा जुना महामार्ग असणाऱ्या रस्त्यावर बांधकाम खात्याच्या दारातच अनेक वेळा अपघात घडलेला खड्डा जर बुजवत नसतील तर तालुक्यातील रस्ते कसे बुजवणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे
खराब झालेले रस्ते व त्या वरील पडलेले भले मोठे खड्डे तातडीने बुजावण्यासाठी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत आणि त्यांचे पदाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व रस्त्यांची झालेली दुरावस्था याची सविस्तर माहिती व त्यातून झालेले अपघात या वर अधिकाऱ्यांबरोबर अर्धा तास चर्चा केली. तालुक्यात छोटे मोठे अपघात रोज चालू आहेत असे सांगत खड्डे बुजवण्याची मागणी आज इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी केली.
तसे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनाही दिले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ऑफिस च्या बाहेर रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवा अन्यथा तो आम्ही बुजवून आंदोलन करू असा इशारा स्वप्नील सावंत यांनी दिला आहे . यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष तानाजी भोंग, वरिष्ठ उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे, तालुका काँग्रेस सरचिटणीस निवास शेळके,भगवान पासगे खजिनदार,संतोष शेंडे, अरुण राऊत,मिलिंद साबळे, सुरेश लोखंडे, आदी उपस्थित होते.










