बारामती : महान्यूज लाईव्ह
ऊस तोडणी हा काही हौसेचा, प्रतिष्ठेचा विषय नाही… गावाकडची आर्थिक उलाघाल असल्याने जगण्याचा तो एक पर्याय आहे.. दीड वितीच्या पोटासाठी चालवलेला एक कष्टप्रपंच आहे.. सध्या गाळप हंगाम सुरू आहे, अशात बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यासाठी ऊसतोडणी करणाऱ्या वाल्मिकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे आणि परिस्थितीवर कुढत बसणाऱ्यांना विचारही करायला भाग पाडले आहे.
चाळीसगाव (जि. जळगाव ) येथून ऊसतोडणीसाठी वाल्मिकी माळी व त्याचे मामा येथे आले आहेत. वाल्मिकी याची आई लहानपणीच वारली. लहान असतानाच वाल्मिकीला तापाचे निमित्त झाले आणि त्याला एक हात व पायास अपंगत्व आले. दोन मुली व वाल्मिकीसारखा पोरगा वयात येण्यापूर्वीच आईने जग सोडल्याने मामाने वाल्मिकीला सांभाळले. त्याच्या दोन्ही बहिणींची लग्ने लावून दिली. वाल्मिकी आता मामांकडेच राहतो.
लहानपणापासूनच मामाने त्यास आधार दिला. वाल्मिकी आज २०-२२ वर्षांचा आहे. वाल्मिकी वयाच्या नवव्या वर्षापासून ऊस तोडणी करू लागला. मागील दहा वर्षांपासून ऊस तोडणी करतो. हंगाम संपल्यानंतर मोलमजूरी मिळाली तर करतो.
वाल्मिकी फक्त एका हात आणि पायाने ऊस तोडणी करतो. ऊस तोडणी हे कष्टाचे काम आहे, मात्र तो लिलया करतो याचे आश्चर्य वाटत असले तरी त्याचे कष्ट पाहिले की, पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. मात्र धडधाकट असूनही परिस्थिती आणि भूतकाळाचे विविध मुद्दे मांडून कुढत आणि रडत बसणाऱ्यांसाठी वाल्मिकीचे उदाहरण हे एक जळजळीत अंजनच आहे.











