महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद गेल्या काही वर्षात संघर्षाची ठिणगी मानली जाते. यावर्षीचे कोविडचे वातावरण आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अचानक एकोणीसावी ऊस परिषद ऑनलाइन देण्याचा घेतलेला निर्णय यामुळे बरीच चर्चा झाली आहे, अर्थात यामागे ‘बारामती’ हे कारण असल्याची चर्चा प्रतिस्पर्धी शेतकरी संघटनामधूनच होताना दिसत आहे, अर्थात कारण बारामती हेच यामागचे कारण आहे, पण… विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीने राज्यपालांच्या नियुक्तीमध्ये राजू शेट्टी यांचे नाव सुचवलेचे हे कारण नाही..
तर बारामती मध्ये झालेल्या दूध दराच्या आंदोलनामध्ये 50 ते 60 जणांना कोरोनाची लागण झाली. दोन कार्यकर्ते तर जिवानिशी गेले खुद्द राजू शेट्टी यांनाही कोरोनावर मात करूनही पुन्हा दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागले, या साऱ्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जीव अनमोल आहे, म्हणूनच ही परिषद ऑनलाइन घेत असल्याचे कारण राजू शेट्टी यांनी दिले आहे.
यासंदर्भात राजू शेट्टी यांनी एक पोस्ट प्रसारित केली आहे त्यामध्ये शेट्टी म्हणतात, संघर्ष आणि ऊस परिषद यांचं नातं अतुट आहे. पहिली ऊस परिषद २००२ साली संघर्षमय वातावरणामध्येच झाली होती. अनेक अडचणी आल्या, वादविवाद झाले, ताण तणावाचे प्रसंग आले पण ऊस परिषद ठरलेल्या वेळीच झाली, अनेकदा कौटुंबिक दु:खाचे प्रसंग आले, तरीही आम्ही ऊस परिषद ठरल्या वेळीच घेतली, कारण या ऊस परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्रातील शेतक-यांचे डोळे लागलेले असतात. अनेकांनी ही परंपरा खंडीत व्हावी म्हणून देव पाण्यात घातले, पण शेतक-यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे त्यांना माघारच घ्यावी लागली.
१९ व्या ऊस परिषदेसमोर सुद्धा थोड्या अडचणी आल्या नाहीत. कोरोनासारख्या महामारीमुळे गर्दी जमणे धोक्याचे होते, तशातच २७ ऑगस्टला बारामतीला झालेल्या दुधदर वाढीच्या मोर्चामुळे स्वाभिमानीचे ५०-६० प्रमुख कार्यकर्ते कोरोनाग्रस्त झाले. या मोर्चाला उपस्थित असणारे महावीर पाटील (कवठेसार ता. शिरोळ), मोहन सांवत पाटील (खेड तालुकाध्यक्ष), या दोन कार्यकर्त्यांचा कोरोनाने बळी घेतला. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने घातलेला बंदी आदेश मोडून कार्यकर्त्यांचा आणि शेतक-यांचा जीव धोक्यात घालून विक्रमसिंह मैदानामध्ये नेहमीप्रमाणे ऊस परिषद घेणे आम्हाला योग्य वाटले नाही. अशातच, २८ ऑक्टोबर रोजी मी सहज रुटीन चेकअपसाठी दवाखान्यात गेलो असता, माझ्या हृदयाच्या ठोक्यांची अनियमीतता पाहून डॉक्टरांनी मला थेट अतिदक्षता विभागात भरती केले, त्यामुळे यावर्षी होणारी ऊस परिषद पुढे ढकलावी असे अनेक कार्यकर्त्यांचे मत होते. पण माझ्यामुळे ऊस परिषदेची तारिख पुढे जाणे मला कदापि मान्य नव्हते.
डॉक्टरांना विनंती करुन मी ऊस परिषदेला हजर राहण्याची परवानगी घेतलेली आहे. उद्या २ नोव्हेंबर रोजी कल्पवृक्ष गार्डनमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये १९ वी ऊस परिषद दु. २ वाजता होणार आहे.
शेतकरी भावांनो, तुम्हाला गेल्या १८ वर्षांमध्ये पहिल्यांदाच हजर राहता येत नाही, याचे दु:ख तुमच्या पेक्षाही मला जास्त आहे असे शेट्टी यांनी भावनिक आवाहन केले आहे.











