काटेवाडी – कन्हेरीच्या परिसरात बिबट्या नर-मादी सापडल्याने सुटकेचा निःश्वास टाकलेल्या नागरिकांना आज पुन्हा हादरा बसला. काटेवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या मागील रहिवासी यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या आज पहाटे बिबट्य़ाने मारून टाकल्या. दोन बिबटे पकडल्याने आता काही शिल्लक नाही असे समजलेल्या नागरिक व शेतकरी मात्र या घटनेने पुरते हादरून गेले. आणखी किती बिबटे या परिसरात आहेत असाच सवाल येथील शेतकरी विचारू लागले असून बिबट्याच्या अजूनही असलेल्या वास्तव्याने येथील भय अजून संपलेले नाही.
कन्हेरीत जवळपास 9 डिसेंबरपासून आजपर्यंत बिबट्याची दहशत सुरूच आहे. संध्याकाळी चारच्या नंतर शेतकरीच नव्हे तर वाड्यावस्त्यांवर सामसूम होते. उसाची मोठी शेती असलेल्या शेतीच्या शेजारी अगदी खुरपणीची कामे करायलाही महिला मजूर कचरत आहेत. बिबट्याच्या भितीपोटी अनेक ठिकाणी शेतीची कामे रखडली आहेत. अशा स्थितीत पहिल्यांदा 30 जानेवारी रोजी कन्हेरीत बिबट्या सापडला आणि त्यानंतर बिबट्याची मादी आक्रमक झाली. तिने एकापाठोपाठ एक करीत सहाहून अधिक जनावरे मारून टाकली. मात्र ती देखील पिंजऱ्यात सापडली. कन्हेरी, काटेवाडी, लाकडी, निंबोड़ीसह इंदापूर व बारामती तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता बिबट्याची भीती उरली नाही अशा अविर्भावात असलेल्या शेतकऱ्यांना मात्र आज (दि.20 फेब्रुवारी) बिबट्याने तडा दिला. आज पहाटे सुरेश माने यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या बिबट्याने मारून खाल्ल्याचे दिसून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही याची पाहणी केल्यानंतर हे कृत्य बिबट्याचेच असू शकते असा प्राथमिक अंदाज वर्तवल्याने आणखी बिबटे काटेवाडी, कन्हेरी परिसरात आहेत हे स्पष्ट झाले आहे, मागील काही दिवसांपूर्वी या परिसरात दोनहून अधिक बिबटे, किंबहूना बिबट्यांचा कुटुंबकबिलाच येथे कार्यरत असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे.










