महान्यूज आजची गझल
विजांचा लोळ नाही पण मुक्या शब्दातले वादळ
जरा जाणून घे ना तू, मनाच्या अंतरीचा तळ
………………………………………………..
नको देऊस पाठिंबा नको मज आमिषे कसली
तुझे कर ठेव पाठीवर मला देतील आत्मिक बळ
………………………………………………..
मनाचा खोल गाभारा किती अंधार वाटेवर
युगाचा सूर्य मावळला किती सोसायची मी कळ
………………………………………………..
मला ते षंढ म्हणताना मला ना खेद त्याचाही
इथे लपवून दु:खाना मनाची होतसे जळजळ
………………………………………………..
मनाचा बुद्ध केल्यावर दिल्या फेकून तलवारी
तुला समजायची नाही अरे शब्दातली चळवळ
………………………………………………..
खळी गालात पडलेली जसा भवरा समुद्राचा
बुडालो हाय पाहुन मी तिच्या डोळ्यातले काजळ
………………………………………………..
उभ्या भिंती व्यथांच्या अन् सुखाचे बघ तडे त्यांना
जशी मायाच दु:खाची असावी वाटते पातळ
………………………………………………..
गझलकार – डॉ.राज रणधीर, जालना
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड











