थोडंसं वेगळं : घनश्याम केळकर, बारामती
दोन भाऊ एकमेकांशी हमरीतुमरीवर आले होते. दोघेही आईची आठवण काढत होते. एक म्हणत होता. ” तुझ्या आई…….. ” दुसरा पण ” तुझ्या आई……” आपल्या दोघांची आई एकच आहे, हे त्या रागात दोघेही बहुतेक विसरले होते. त्यांची आईही तिथेच डोक्याला हात लावून बसली होती.
शिवी संस्कृतीतले व्यावसायिक तज्ञ सोडले तर शिवी हे दुबळ्यांचे हत्यार आहे. आपण आता समोरच्याचे काहीच करु शकत नाही असे लक्षात आले की मग माणूस दोन चार शिव्या हासडून मनातला राग बाहेर काढतो आणि मोकळा होतो. त्या अर्थाने शिवी ही मनात साठलेल्या भावनांचा निचरा करण्याचे एक साधन असते. पण समोरचा माणूस निगरगट्ट नसेल तर ती शिवी त्याच्या मनात रुतून बसते. एक शिवी दिली म्हणून दहा दहा वीस वीस वर्षे एकमेकांशी अबोला धरलेली माणसंही माझ्या पाहण्यात आहेत.
सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणूस शिवी देणाराला भितो ते यामुळेच. आपल्याला कुणी शिवी दिली तर आपला फार मोठा अपमान होईल या भावनेने तो कुठल्याही भांडणात हातचा राखूनच भाग घेतो. आणि याचाच अनेकजण गैरफायदा घेतात
पोलिस फार शिव्या देतात, गुन्हेगारांशी याच भाषेत बोलावे लागते असे लोक म्हणतात. पण मी स्वत: कोणत्याही पोलिसाला शिव्या देताना ऐकलेले नाही. बहुतेक त्यांची आणि माझी चुकामुक होत असावी.
काही बायका अस्सल शिव्या देत असल्या तरी याही क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी आहे. आणि बहुतेक शिव्या या आई बहिणीवरूनच असतात. कोकणात काही ठिकाणी बापावरुन देखील काही शिव्या प्रचलित आहेत हा एक अपवादच म्हणायचा.
असो, तर असे हे शिवीपुराण शेवटी गौतम बुद्धाच्या एका गोष्टीने संपवतो. गौतम बुद्धांना एका माणसाने खुप शिवीगाळ केली. पण बुद्धांनी त्याला काहीच उत्तर दिले नाही. अखेर तो माणूस निघून गेला. बुद्धांच्या एका शिष्याने त्यांना विचारले, ” या माणसाने तुम्हाला ऐवढ्या शिव्या दिल्या पण तुम्ही काहीच बोलला नाहीत.” बुद्ध त्याला म्हणाले, ” त्याने दिल्या पण मी त्या घेतल्या नाहीत, त्यामुळे त्या परत त्याच्याकडेच गेल्या.”
शेवटी काय घ्यायच ते आपणच ठरवायचं.











