चौकशी व संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील मेंढपाळांच्या चरण्यासाठी गेलेल्या 40 बकऱ्यांनी पाणी पिल्यानंतर त्यांना विषबाधा झाली, यात 17 मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील कंपनीने रासायनिक युक्त सांडपाणी रस्त्यावर सोडल्याने व हे पाणी या बकरी पिल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके यांनी केली आहे.
पाटस (मोटेवाडा ) येथील लक्ष्मण बरकडे, लालू आबा बकरके हे बकरा चरण्यासाठी आज बुधवारी ( ता.28 ) कुरकुंभ औद्योगिक परिसरातील मोकळ्या माळारानावर गेले होते.
यावेळी दुपारी 50 ते 60 बकऱ्यांनी सांडपाणी पिल्याने 40 बकऱ्यांना विषबाधा झाली, यात सुमारे 17 बकरी दगावल्या. मीरा केमिकल कंपनीजवळ ही घटना घडली. रस्त्यावर कंपनीचे रासायनिक दुषीत सांडपाणी सोडल्याने आणि हे पाणी बकरी पिल्याने त्यांना विषबाधा होवून त्यांचा मृत्यु झाला आहे. असे मेंढपाळाचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. प्रशासनाने संबंधित मेंढ्या मृत्यूचा पंचनामा करावा, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या रासायनयुक्त सांडपाण्याची तपासणी करावी, संबंधित दोषी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके यांनी केली आहे.










