महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एकनाथ खडसेंना भाजप सोडून एक आठवडाही होत नाही, तोच कालच्या ऊसतोडणी संपाच्या तोडग्यानंतर आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना सलाम केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पंकजा मुंडे यांनी काल एक ट्विट करून पवारसाहेब तुम्हाला सलाम, कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि काम करण्याच्या स्टॅमिनाचे कौतुक वाटले. पक्ष विचार आणि राजकारण वेगळे असले तरी कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे असे ट्विट करीत पवार यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.
अर्थात पंकजा मुंडे यांनी केलेले हे ट्विट वरकरणी पवारसाहेबांविषयी प्रेम व्यक्त करणारे व गोपीनाथ मुंडे यांच्या शिकवणीचे असले तरी भाजपला इशारा देखील आहे. कारण काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी आपले राजकीय कट्टर शत्रू व बंधू धनंजय मुंडे यांच्यासोबत केलेला वार्तालाप मराठवाड्यातील दोघांच्या समर्थकांनाही सुखावून गेला आहे. अशा स्थितीतच नाथाभाऊ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडली आहे आणि पंकजा मुंडे यांचेही राज्यातील नेतृत्वाशी फारसे पटत नाही.
दुसरीकडे भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाला देखील मुंडे व गडकरी गटाचे पक्षातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांच्या वारसदार व नेत्यांना अडगळीत टाकायचेच आहे. म्हणूनच ऊस तोड मजूरांच्या संपाचे नेतृत्व भाजपने आमदार सुरेश धस यांच्याकडे देण्याचा प्रयत्न केला, त्यातून पंकजा यांची कोंडी करण्याचा प्रयत्न स्वपक्षानेच केल्यानंतर पंकजा यांनी एकच ट्विट करून भाजपला गोंधळात टाकले आहे.
पंकजा यांनी साधलेले हे शरसंधान आहे आणि यापुढील काळात राजकीय समीकरणे काहीही होऊ शकतात हेही त्यातून अप्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटने आज राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली. भाजपला शेठजी आणि भटजी यांच्यापलीकडे घेऊन जाणारे मुंडे-गडकरी यांचे गटच मोडीत काढण्यामुळे पक्षातून बहुजन नेत्यांची कोंडी केली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. याच वातावरणात पंकजा यांनी केलेले ट्विट अनेकार्थांनी भाजपला अस्वस्थ करणारे आहे.










