बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना आता गावागावात चोरांचा प्रभाव वाढू लागेल, हे लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच ग्रामसुरक्षा दलाची यंत्रणा बळकट करण्याचा केलेला प्रयत्न तालुक्यातील का-हाटी येथे फायद्याचा ठरला.
26 ऑक्टोबर रोजी का-हाटी येथे मध्यरात्री दुचाकीवरून दोन अज्ञात चोरट्यांनी एकजणास लुटण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्ती दुचाकीवरून घरी निघाली होती. त्यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना कळवताच पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाची यंत्रणा सतर्क केली.
दोन जण दुचाकीवरून कोयत्याचा धाक दाखवून जळगाव कडेपठारच्या दिशेने येत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली, त्यामुळे ग्रामस्थ सतर्क झाले आणि ग्रामस्थांनी या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी गाडी रस्त्यावर टाकून उसामध्ये पळ काढला आणि ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
दुचाकी ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे आता चोरटे सापडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामसुरक्षा दल सतर्क असल्याचा काय परिणाम होतो, याचा एक उत्तम नमुना असून गावागावातील ग्रामसुरक्षा दल आता अधिक बळकट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.










