महान्यूज : आजची गझल
तुझ्या नि माझ्या असे मधोमध नग्न सरोवर
बुडून जावे की डुंबावे प्रश्न खरोखर ….
देहमनाचा घमघमणारा फाया होइल
तुझे नि माझे असेच होइल… होइल जोवर
रोज एकटी बाकावर त्या किती बसू मी
जाताना ती सांजवेळ ने तुझ्याबरोबर
फक्त एवढे म्हणता तू … झोकून दिले मी …
नको करुया काही गोष्टी तुला नको तर …
किती रंग चढवले लाखदा आत्म्यावर मी
निळीसावळी कधी न दिसले तुझ्या अगोदर
कुणाकुणाला दंश दाखवू कुठले कुठले
कुठे कुणाला माहित असतो पहिला मोहर …
गझलकार – शिल्पा देशपांडे
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड










