शिरवली – ३० हजार लिटर क्षमतेची डिस्टीलरी जेवढे उत्पन्न देते, तेवढेच उत्पन्न ६० हजार लिटरची माळेगावची डिस्टीलरी देते. ४ हजार टन कारखाना ६ हजारांपर्यंत दररोज गाळप करीत होता, तिथे २०० कोटी खर्चून कारखाना फक्त ७ हजारापर्यंतच चालतो. माळेगावच्या सभासदांनी भावनेला किंमत न देता भविष्याचा व व्यवहाराचाच विचार करावा असे आवाहन बाजार समितीचे संचालक सुनिल पवार यांनी शिरवली येथे केले.
निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचारानिमित्त शिरवली येथे झालेल्या सभेत सुनिल पवार बोलत होते. यावेळी माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, सतीश खोमणे, अॅड. केशवराव जगताप, माजी उपसभापती डॉ. अनिल सोरटे, पोपटराव तुपे, नितीन शेंडे, अशोक नवले, राजेंद्र गावडे यांच्यासह पॅनेलचे उमेदवार व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले,भाजपच्या नेत्यांनी खोटी आश्वासने दिली, आंदोलनाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली व सत्ता मिळवली. मात्र प्रामाणिकपणे शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान केले. पाच वर्षातील या सत्ताधाऱ्यांचा कारभार सर्वांसमोर आहे, राजकारण म्हणून कोणावरही आम्ही टिका करीत नाही. आपण कारखान्याला घातलेला ऊस वेळेत गाळप व्हावा, त्यापासून चांगली साखर करावी, योग्य दरात ती बाजारात विकावी, जास्तीत जास्त वीज तयार करावी व त्या माध्यमातून चांगला दर मिळावा ही सामान्य सभासदांची अपेक्षा असते. आमच्यापेक्षा ते जास्त गप्पा मारतात, मात्र भावनेने पोट भरत नाही. बाळासाहेब भाऊंनी त्यांच्या कार्यकाळात जबाबदारी उत्तम पार पाडली. मागील पाच वर्षात त्यांनी ६६८ रुपये इतर कारखान्यांच्या तुलनेत जास्त सभासदांना दिले. साडेदहा लाख पोती शिल्लक होती. तरी देखील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या काळात इतर कारखान्यांच्या तुलनेत फक्त २०१ रुपये अधिक दिले. निवडून आल्यानंतर यांनी संगनमताने कमी दरात साखर विकली. त्याच काळात २५८ रुपये प्रतिक्विंटलने अधिक दराने इतर कारखान्यांनी साखर विकली. २६ कोटींचे उत्पन्न बुडवले. बाळासाहेब तावरे यांनी ४ हजार टन क्षमतेचा कारखाना अगदी सहा हजार टनांपर्यंत चालवून दाखवला. मात्र सत्ता येताच ६० ते ६२ कोटी रुपये खर्चून अधुनिकीकरण केले. पुढच्याच वर्षी विस्तारीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २०० कोटींचा खर्च करून ७५०० टन क्षमतेचा त्यांनी केला, मग ४ हजार टन क्षमतेचा कारखाना ६ हजारापर्यंत चालवला, तर ७५०० टन क्षमतेचा कारखाना किती टन चालायला हवा होता? आज त्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे की, माळेगावचा सर्वात कमी साखर उतारा मिळू लागला आहे. हा त्यांचा कारभार आहे. सर्वच बाबतीत ते अपयशी ठरले आहेत. जुनी डिस्टीलरी पाडून भंगारात विकून २८ कोटी खर्चून नवी डिस्टीलरी उभी केली. ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टीलरी करणाऱ्यांनी उत्पन्न मात्र सोमेश्वरच्या ३० हजार लिटर क्षमतेची डिस्टीलरीएवढेच मिळवले. नवी डिस्टीलरी उभी करण्याची घाई का केली? यामध्ये जे घडले आहे, ते त्यांच्याकडे पूर्वी गेलेली मंडळी सांगू लागली आहेत. पवारसाहेबांनी, अजितदादांनी कधी सहकारात राजकारण आणले नाही, यांनी मात्र राजकारण आणून घराघरात भांडणे लावली. सोमेश्र्वर कारखाना अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली चालतो, तिथे राज्यात सर्वाधिक भाव मिळतो, त्यामुळे सत्ताधारी जे सांगतात, ओरड करतात ते पूर्णतः चुकीचे व खोटे आहे. आमच्यावर निष्क्रीयतेचा आरोप करणाऱ्यांनी बाळासाहेब तावरे यांनी किती कामे केली याची माहिती घ्यावी.
यावेळी राष्ट्रवादीला पाठींबा दिलेले अपक्ष उमेदवार अनिल तुपे यांचेही भाषण झाले.










