इंदापूर : महान्यूज लाईव्ह
बुधवारी रात्री आलेला पाऊस हा फक्त ओढ्याकडच्या रहिवासी व शेती, शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरला नसून तो व्यवसायांना देखील मारक ठरला. इंदापूर, बारामती तालुक्यातील अनेक व्यावसायिकांना या पावसाच्या पाण्याचा फटका बसला असून, छत्रपती कारखान्याला देखील मोठा फटका बसला आहे. कारखान्याची तब्बल पंचवीस हजार साखर पोती या पावसाच्या पाण्यात भिजली आहेत.
मागील आठवड्यात बुधवारी झालेला पाऊस हा विक्रमी होता. इंदापूर तालुक्यातील सणसर येथे हा पाऊस तब्बल 212 मिलिमीटर पडला. ढगफुटीसारखा पाऊस पडला, त्यामुळे पावसाचे पाणी जिथून मिळेल तिथून वाट काढत होते.
हे पाणी जसे घरांमधून, शेतामधून नुकसान करीत गेले, त्याचप्रमाणे भवानीनगरसारख्या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गोदामात ही शिरले. कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी नेहमी साखर पोत्यांची काळजी घेतली जाते, परंतु पाऊस एवढा तुफान होता की, पावसाच्या पाण्याने अनेक ठिकाणी हाहाकार उडवला. यातच छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अंदाजे 25 हजार पोती या पाण्यात भिजली आहेत आणि कोट्यवधींचे नुकसान यामध्ये झाले.
प्रशांत काटे, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर : या पावसात तात्पुरत्या उभारलेल्या गोदामाच्या ठिकाणी पाणी घुसल्याने साखर पोती भिजली आणि नुकसान झाले आहे. या साखर पोत्यांचा विमा होता, त्यामुळे विमा भरपाई घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.











