भंडाऱ्याची उधळण करत संबळाच्या निनादात परिसर दुमदुमला
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत वाघ्या मुरळी यांनी आपल्या कला सादर केल्या. वाघ्या मुरळी परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसील कार्यालयासमोर आज जागरण गोंधळ घालण्यात आले. यावेळी संबळाच्या आवाजाने परिसर दुमदुमला.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. आज सकाळी साडेअकरा वाजता शहरातून ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी वाघ्या-मुरळीच्या वाद्यांनी परिसर दणाणून गेला.
वाघ्या मुरुळी परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले.
वाघ्या मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा. वाघ्या मुरळी कलावंतांच्या मुलामुलींना शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, वाघ्या मुरळी लोककलेच शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळून नोंदणी करण्यात यावी, या कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी, वाघ्या मुरळी कलावंतांना कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी, महाराष्ट्रातील लोक कलावंतांसाठी स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, देवालय, मंदिर, राऊळ, खुली करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.











