महान्यूज : आजची गझल
कुठे कुणाची भळभळ झाली मी गेल्यावर
फक्त जराशी हळहळ झाली मी गेल्यावर
•
होते तोवर वेळच नव्हता माझ्यासाठी
अन लोकांची वर्दळ झाली मी गेल्यावर
•
वाहत आहे तसाच वारा काठावरती
लाटांचीही खळखळ झाली मी गेल्यावर
•
भ्रमात होते वसंत सुकला माझ्यामागे
पुन्हा ऋतूंची सळसळ झाली मी गेल्यावर
•
रिते कुणाला कधी वाटले माझ्यावाचुन
रिती कुणाची ओंजळ झाली मी गेल्यावर ?
•
नाव कधी हे ओठावरती आले नाही
चर्चा माझी पुष्कळ झाली मी गेल्यावर
•
मी गेल्यावर, दिसले माझे चांगुलपणही
दुनिया भलती प्रांजळ झाली मी गेल्यावर
•
गझलकार – अनिता बोडके, नाशिक
सौजन्य: गझलपुष समूह पिंपरी-चिंचवड











