बारामती – माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत सत्ताधारी सहकार बचाव पॅनेलने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील छत्रपती कारखान्याचे उदाहरण देत प्रचारास सुरवात केल्यानंतर आता राष्ट्रवादीने राष्ट्रवादीच्या ताब्यातील सोमेश्वर कारखान्याला पुढे केले आहे. सोमेश्र्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी अत्यंत संयमी भाषेत माळेगावचा कारभार आकडेवारीनिशी उघडा करण्यास सुरवात केल्याने निवडणूकीत रंगत आली आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. सहकार बचाव पॅनेलचे नेते चंद्रराव तावरे व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांनी उच्चांकी भाव एकीकडे व छत्रपती कारखान्याची स्थिती दुसरीकडे अशी उदाहरणे पुढे करीत माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनेलवर टिका करायला सुरवात केली, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माळेगावच्या कथित विस्कळीत कारभाराला लक्ष्य केले आहे. आता मधल्या टप्प्यात माळेगाव कार्यक्षेत्रात सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप हे प्रचारसभा गाजवित आहेत. त्यांनी त्यांच्या कारखान्याच्या फुले २६५ जातीच्या उसाचे अधिक गाळप करूनही आमचा साखर उतारा ११.३४ टक्क्यांवर म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे सांगत माळेगावला लक्ष्य केले आहे. माळेगावमध्ये उसाचा रस वाहून जात असल्याबाबत राष्ट्रवादीने केलेल्या टिकेला जोडून साखर उतारा का घटला आहे याचे मार्मिक उदाहरण जगताप देत असून माळेगावने ओढून ताणून दिलेला भाव असल्याचेही सभासदांना समजावून सांगत आहेत. जगताप यांच्या अभ्यासू भाषणांनी या निवडणूकीत रंगत आली असून बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, योगेश जगताप, अनिल तावरे आदी नेत्यांनीही या निवडणूकीत माळेगावच्या कारभारावर ताशेरे ओढण्यास सुरवात केली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा कार्यक्षेत्रात होणार आहेत.











