बारामती : माळेगावचा साखर उतारा 10.46 टक्के, तर छत्रपतीचा 10.76 टक्के आहे. छत्रपतीचे टोटल लॉसेस 1.92 टक्के तर माळेगावचे 2.25 आहे. छत्रपती कारखान्याचे युनिट 105 टक्क्यांनी सुरू आहे, माळेगावची कार्यक्षमता सध्या फक्त 92 टक्क्यांनी सुरू आहे. मग पाठीमागे कोण आहे? तुम्ही एवढा पराक्रम केलात की गेस्ट हाऊसला तुम्ही सिरप पाजलात. तरीदेखील छत्रपती कारखान्याला बदनाम करता. तुम्ही तुमचे पाप झाकण्यासाठी दुसर्यांवर टिका करता? अशा शब्दांत छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी माळेगावच्या कारभाराचे वाभाडे काढले.
निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या निमित्ताने काटे यांनी मळद, गुनवडी व डोर्लेवाडी या छत्रपती व माळेगाव कारखान्याचे संयुक्त कार्यक्षेत्र असलेल्या गावांमध्ये सभा घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे हे छत्रपती कारखान्याचे नाव घेऊन राष्ट्रवादीवर टिका करीत होते, त्या पार्श्वभूमीवर काटे यांनी पहिल्यांदाच या निवडणूकीत आपली भूमिका मांडली. यावेळी सर्व उमेदवारांसह जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
काटे म्हणाले,प्रचाराची पातळी अतिशय खालच्या स्तरावर चालली आहे. सहकार बचाव म्हणजे नेमके काय? एका सहकारी साखर कारखान्याने दुसर्या सहकारी साखर कारखान्यातून ऊस पळवापळवी करून सहकार बचाव होत नसतो. मला नक्की हेच कळत नाही की, छत्रपतीची निवडणूक सुरू आहे की, माळेगावची निवडणूक सुरू आहे? बहुधा माळेगावचे वास्तव समोर येऊ नये म्हणून त्या लोकांनी छत्रपतीवर घसरण्यास सुरवात केली. ज्या माळेगावच्या अध्यक्षांनी आमच्यावर टिका केली, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, आमचा कधीही रस रस्त्यावर, गेस्ट हाऊसपर्यंत आला नाही. आम्ही काटकसरीनेच कारभार केला, तुम्ही कसा करता आहात हे कारखान्यांच्या पदाधिकार्यांना सांगायची गरज नाही. अर्थात माळेगावच्या कार्यक्षेत्रात सहकार बचाव म्हणत यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे, आमच्याकडेही छत्रपती बचाव म्हणत दररोज कामात आडकाठी आणली जाते. आता खरेतर अशा आडकाठी करणार्यांकडून, दररोज कोर्टकचेर्या करून कारखान्याच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणणार्यांपासूनच वाचविण्याची गरज आहे. माळेगावच्या सभासदांनी एक लक्षात घ्यावे की, वेळ पुन्हा पुन्हा येत नाही, एकदा झालेली चूक निस्तरण्यासाठी पाच वर्षे लागतात. माळेगावमध्ये मागील पाच वर्षात यांनी फक्त आरडाओरडा केला, मालतारण कर्जाला कर्ज म्हणता येत नाही. पण बाळासाहेब तावरे यांच्या काळात कर्ज झाले अशी ओरड करीत लोकांची दिशाभूल केली. आज मात्र माळेगाववर कर्ज तर करून ठेवलेच आहे, शिवाय माळेगावचे विस्तारीकरणही कसे फसलेले आहे हे सर्वांनी पाहिलेले आहे. माळेगावच्या सहवीजनिर्मिती प्रकल्प फक्त 40 टक्के कार्यक्षमतेने चालतो. छत्रपती कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प 52 टक्क्यांनी चालतो. अशा अकार्यक्षम लोकांनी छत्रपती कारखान्याला शिकवू नये. आमचे दोन युनिट आहेत, राज्यात अनेक कारखान्यांना यंत्रणा कमी आली. तिकडे पाऊस झाला. हा छोटा हंगाम म्हणून कामगारांनी याकडे पाठ फिरवली. कर्नाटकात एक महिना अगोदर कारखाने सुरू झाले, त्याचाही परिणाम झाला. दुसर्याच्या नावावर जोगवा मागू नका. छत्रपतीची चर्चा करता, मग ज्यांच्या पाठीमागे तुम्ही अगोदर फिरत होता, त्या इंदापूर तालुक्यातील इतर कारखान्यांची चर्चा का करीत नाही? सभासदांनी देखील माळेगाव आणि छत्रपती बाबत सत्य समजावून घ्यावे. सहकार बचाव म्हणणार्या लोकांमुळेच सहकाराचे वाटोळे झाले आहे.
भारत गावडे यांनी खांडज येथील वाघ यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.










