बारामती – सोमेश्र्वरकडे 85 टक्के ऊस हा 265 जातीचा, तरीदेखील आमचा साखर उतारा 11.34 टक्के आहे, माळेगावचा साखर उतारा का कमी आहे? रस, सिरप वाहून जात असेल तर सभासदांनी भविष्याचा विचार करावा आणि गेटकेनधारकांचे पैसे कमी करून, कर्ज काढून उसाचा दर दिला जातो अशी टिका सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी मानाजीनगर येथे केली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलच्या वतीने मानाजीनगर, धुमाळवाडी आदी भागात प्रचार सभा झाल्या. या सभांमध्ये जगताप यांनी टिका केली. यावेळी पॅनेलचे उमेदवार व सभासद उपस्थित होते.
जगताप म्हणाले,सोमेश्वर कारखाना सभासदांचा ऊस गाळप करतो आणि माळेगाव कारखाना 35 टक्के गेटकेनचा ऊस गाळप करतो. भाव जाहीर करताना माळेगाव कारखान्याने गेटकेन आणि सभासदांमध्ये मागील हंगामात 550 रुपयांचा फरक ठेवला, त्या फरकाचा व 7 लाख टन सभासदांच्या उसाचा विचार केला तर माळेगावने 280 रुपये अधिकचा भाव द्यायला हवा होता. खरेतर माळेगावच्या निवडणूकीत सोमेश्वरची चर्चा अधिक होत असल्याचे समाधान आहे. मात्र सोमेश्वर काही वर्षांपूर्वी माळेगावच्या खूप पाठीमागे होता. सोमेश्वरचे सन 2010-11 मध्ये विस्तारीकरण झाले. सन 2016-17 मध्ये सोमेश्वरने 2900 रुपये दर दिला, तेव्हा माळेगावने 3100 रुपये दर दिला. तर 2017-18 मध्ये सोमेश्वरने 3 हजार रुपये, माळेगावने 2900 रुपये दर दिला. मागील हंगामात सोमेश्वरने 3300 रुपये दिला, तेव्हा माळेगावने 3400 रुपये दर दिला. एकूणात माळेगावने 200 रुपये दर अधिक दिला. मात्र सोमेश्वरने 290 कोटींपैकी 266 कोटींचे कर्ज फेडले. ऊस दर देतानाच 20 कोटी रुपयांचा चढउतार निधी राखून ठेवला. चार वर्षात बेसल डोस, तोडणी वाहतूक कर्जांसह प्रकल्पाच्या मध्यम मुदत कर्जाची 266 कोटींची कर्जफेड केली. आताची कर्जे ही केवळ एफआरपीची कर्जे आहेत, ती राज्यात सर्वच कारखान्यांची आहेत आणि नियमित आहेत. सोमेश्वरने मागील हंगामात 69 हजार क्विंटल लेव्ही मागील वर्षी सरकारला दिली. त्यात 10 कोटींचा फटका बसला. लेव्हीचा दर कमी मिळतो. खुल्या बाजारात त्या साखरेचे 10 कोटी अधिक मिळाले असते. आम्हाला 100 रुपये अधिक देता आले असते.
जगताप पुढे म्हणाले,या हंगामात आतापर्यंत 4.95 लाख टनांचे गाळप सोमेश्वर कारखान्याने केले आहे. साखर पोती मात्र गाळपापेक्षा 63 हजार क्विंटल जास्त म्हणजे 5.58 लाख एवढी आहेत. कारण कारखान्य़ाला 11.34 टक्के साखर उतारा सरासरी मिळाला. विशेष म्हणजे 265 जातीचा ऊस 85 टक्के आम्ही गाळप करतो. त्यामुळे सभासदांच्या पै न पैचा विचार आपण केला नाही, तर रात्रंदिवस आपण जे कष्ट करतो, त्याला योग्य तो मोबदला मिळणार नाही. माळेगावात आज सर सिरप, रस वाया जात असेल, आपले नुकसान होत असेल तर दर कसा मिळणार या प्रश्नाचा विचार करावा. आमच्याकडे 85 टक्के 265 असूनही साखर उतारा 11.34 टक्के आहे, जेवढा साखर उतारा अधिक तेवढी एफआरपी जास्त असते. त्यामुळे साखर उताऱ्यात पडणारा 9 किलो साखरेचा फरक लक्षात घेतला तरी टनामागे 300 रुपयांपर्यंत फरक पडतो. आज 2789 रुपये आमची एफआऱपी आहे, माळेगावची 2696 रुपये एफआरपी आहे. सोमेश्र्वर कारखान्याने केवळ 18 कोटींचे तोडणी, वाहतूकीसाठी या हंगामात कर्ज घेतले व ते 100 टक्के वापरले. माळेगावने किती कर्ज घेतले, बेसल डोससाठी किती कर्ज घेतले आणि जाहीर करावे. कारण कर्ज काढून उसाचे दर देता येईल, अनेक कारखाने तसे वागतात, मात्र त्यातून अडचणी येतात. कर्ज काढून दर देणे ही अधोगतीची वाटचाल आहे.
अनिल तावरे म्हणाले,बाळासाहेब तावरे यांनी त्यांच्या काळात खूप अधिक दर दिला. आज माळेगावची सर्वच बाबतीत अधोगती आहे, रस वाहून जातो. मळीच्या टाक्या जळतात. फक्त बोलघेवडेपणातून दाखवल्या जाणाऱ्या प्रगतीमागचे सत्य लपणार नाही. सभासदांपुढे ते आले आहे. बाळासाहेब तावरे यांचा काटकसरी व स्वच्छ कारभार आणि आजचा कारभार यातील फरक सभासदांनाही कळून चुकला आहे. त्यामुळे या निवडणूकीत परिवर्तन होणार.











