दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील राजेगाव येथे राजेगाव ते खानोटे रस्त्यावर खानोटे येथील चौघे दुचाकीवरून प्रवास करीत असताना ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह वाहून गेले. यापैकी तीन जणांचा मृतदेह सापडला असून एकाचा शोध ग्रामस्थ घेत आहेत.
आप्पासाहेब धायतोंडे, कलावती धायतोंडे, सुभाष लोंढे ( रा.खानवटे ता.दौंड.जि.पुणे ) या तीन जणांचा काल पावसाने बळी घेतला.
काल दुपार पासून पावसाची संततधार सुरू होती. काल रात्री पावसाचा जोर वाढला होता. विजेच्या कडकडाटासह पाऊस मुसळधार पडत होता. ओढे नाले पावसाने तुटूंब भरून वाहू लागले बोते. याच पावसाने रात्री दौंड तालुक्यातील खानवटे येथील चार नागरीकांचा बळी घेतला.
राजेगावला जोडले जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले व रात्रीच्या वेळेस पाण्याचा अंदाज नसल्याने खानोटे येथील रहिवाशी असलेले दोघे मोटारसायकलवर राजेगावहून खानोट्याच्या दिशेने प्रवास करीत होते. मात्र या पावसामुळे ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुचाकीसह चौघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
आज सकाळी नागरीकांनी या वाहून गेलेल्या नागरीकांचा शोध सुरू केला असता आप्पासाहेब धाडतोंडे,(अप्पा हे टोपन नाव असून पुर्ण नाव समजू शकले नाही.) कलावती धायतोंडे, सुभाष लोंढे या तीन जणांचे मृतदेह सापडले
या रस्त्यावरून रात्री सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत होते. राजेगाव ते भिगवण रस्त्यावर तुकाई मंदिराजवळील ओढ्याला महापूर आल्याने हा मुख्य रस्ता बंद होता. राजेगाव ते दौंड रस्त्यावरील ओढ्यावरून ठिकठिकाणी पाणी ओसंडून वाहात असल्याचे चित्र होते. अशीच परिस्थिती तालुक्यातील अंतर्गत गावातील ओढे नाले व रस्त्यावर होती. यामुळे वाहतूक पूर्ण पणे बंद होती. मात्र काहीजण प्रवास करण्याची रिस्क घेत असल्याचे चित्र होते.











