बारामती : महान्यूज लाईव्ह
आज आज सकाळपासून वादळाचा तडाखा जरी सोलापूर जिल्ह्यात असला तरी पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्याला या वादळी पावसाचा सर्वात मोठा तडाखा बसला अनेक गावातील ओढ्यांना महापूर आले तर अनेक गावातील वाड्या वस्त्या पाण्याखाली गेल्या इंदापूर शहर निमगाव केतकी, निरवांगी येथे प्रवाहात वाहून जाणारी माणसे वाचवावी लागली.
गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात पहिल्यांदा अशा स्वरूपाचा पाऊस इंदापूर व बारामती तालुक्याने अनुभवला आज पहिल्यांदा दुरुस्ती करून मोठ्या केलेल्या ओढ्यांना महापूर आला. बारामती शहरातील रस्त्यांसह मोतीबाग शेजारील रस्ता, इंदापूर बारामती रस्त्यावरील काटेवाडी नदीचा पूल, जळोची कडे जाणारा खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल समोरील रस्ता, सणसर येथील ओढ्यावरील पूल, लासुर्णे, निमसाखर, निरवांगी, निमगाव केतकी आदी अनेक गावातील ओढ्यांना महापूर आला. निमगाव केतकी येथे व इंदापूर शहरात जणू एखादी नदी गावातून आत मध्ये वाहत असावी अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती.
उजनी दरवर्षी भरते त्या वेळी रस्त्याच्या कडेपर्यंत पाणी येते मात्र पहिल्यांदा उजनीचे पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या वरती आलेले पाहिले आणि येथील वाहतूकही थांबवावी लागली.
सप्टेंबर महिन्यात येथे अतिवृष्टी झाली मात्र या अतिवृष्टीच्या काळात ही एवढे नुकसान झाले नव्हते एवढे भयानक नुकसान या चक्रीवादळाच्या पावसामुळे झालेले इंदापूर आणि बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे शेतीचे, उभ्या पिकाचे आणि अनेक घरांचे नुकसान झाले आहे.











