राजकारणात पिसाळलेली कुत्री आलीत, इकडे भुंक तिकडे चाव सुरूय!’ नवनाथ बन यांच्या आरोपावर रोहित पवारांचा जहरी पलटवार; MPSC आंदोलनावरून पुण्यात राजकीय भडका
पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस असताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून रोहित पवारांचा पॉलिटिकल स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे,’ असा खळबळजनक दावा केला. यावरून संतापलेल्या आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर देत नवनाथ बन आणि भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. भाजपमध्ये असल्याने यांना लाज उरलेली नसून, राजकारणात पिसाळलेली कुत्री आली आहेत आणि त्यांचे काम केवळ ‘इकडे भुंक आणि तिकडे चाव’ एवढेच उरले आहे, अशा अत्यंत जळजळीत शब्दांत पवारांनी निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत कथित व्हिडिओ सादर करत नवनाथ बन यांनी आंदोलनात विद्यार्थ्यांऐवजी राजकीय कार्यकर्त्यांचीच गर्दी असल्याचा आरोप केला. या आंदोलनात फक्त २० टक्के खरे विद्यार्थी असून उरलेले ८० टक्के रोहित पवारांचे कार्यकर्ते, बारामती ॲग्रोचे कर्मचारी आणि काँग्रेसचे लोक असल्याचा दावा बन यांनी केला. आंदोलन फसल्याचे दिसताच फोनाफोनी करून गाड्यांची रसद पुरवण्यात आली आणि भाड्याने माणसे आणली गेली, असा गंभीर आरोप करत इनोव्हा आणि फॉर्च्युनरमधून आंदोलनाला येणारे नेमके कोणते विद्यार्थी आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यातील किंवा बारामतीतील मतदारसंघावर डोळा ठेवूनच रोहित पवार पुण्यात हा राजकीय तमाशा उभा करत असल्याचा हल्लाबोलही बन यांनी केला.
या आरोपांना उत्तर देताना रोहित पवारांनी थेट नवनाथ बन यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्ही भाजपमध्ये असल्याने तुम्हाला लाज वाटण्याचा संबंधच नाही, असा टोला लगावत त्यांनी दाखवलेल्या व्हिडिओखाली सर्वसामान्य जनतेने काय कमेंट्स केल्या आहेत त्या आधी वाचून घ्याव्यात, असा सल्ला पवारांनी दिला. रस्त्यावर पिसाळलेली कुत्री फिरत असली तर आपण त्यांना हात लावायला जात नाही, त्यामुळे अशा कुत्र्यांच्या भुंकण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा तीव्र वार त्यांनी केला.
आपल्याला किंवा आपल्या मुलांना एमपीएससी देऊन अधिकारी व्हायचे नाही, त्यामुळे यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसून केवळ सामान्य घरातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि परीक्षेच्या शुद्धीकरणासाठीच हा लढा सुरू असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. संध्याकाळी जमणारी चाळीस हजारांची गर्दीच विरोधकांच्या आरोपांना उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, सरकारने मागण्या मान्य न केल्यास विद्यार्थी पुणे बंद करतील आणि थेट मुंबईत मंत्रालयावर धडकतील, असा दोन दिवसांचा थेट अल्टीमेटम रोहित पवारांनी दिला आहे.










