बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्याचे माजी पणनमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केडगाव चौफुला येथील कालच्या सभेत बोलताना बाजार समिती बाजार समितीच्या बाहेरही शेतकऱ्यांकडून सेस गोळा करेल असा फतवा काढत आहे असे वाक्य वापरले, त्यावरून बारामती बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांनी पत्रक प्रसिध्दीस देऊन चंद्रकांतदादा राजकीय व धादांत खोटे बोलले आहेत असा फलटवार केला आहे.
खलाटे यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केल्यानुसार बारामती बाजार समितीकडून बाजार आवाराबाहेर शेतकऱ्यांकडून अगर व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा मार्केट सेस वसूल केला जात नाही. यासंदर्भात कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. बारामती बाजार समितीने कृषी विधेयके मंजूर झाल्यानंतर व स्थगिती आदेशानंतर कोणत्याही प्रकारची परिपत्रके काढलेली नाहीत, तसेच मार्केट सेस गोळा केलेला नाही. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असते. या बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी बाजार आवारात विविध उपक्रम व सोयीसुविधा राबवल्या आहेत.
स्पर्धात्मक दर, अचूक वजनमार, त्याच दिवशी शेतकरी पट्टी, लिलावापूर्वी शेतमालाचे वजन व ऑनलाईन लिलाव पध्दत आदी उपक्रम राबवले आहेत. निर्यात सुविधा केंद्रासह उपबाजार, सेलहॉल, शेतमाल तारण कर्ज योजनांसह शासनाची खरेदी केंद्रे यशस्वीरित्या चालवली आहेत. ही महाराष्ट्रातील अग्रगण्या व शेतकरी हिताची बाजार समिती असल्याने चंद्रकांत दादांनी धादांत खोटे बोलू नये असे खलाटे यांनी म्हटले आहे.











