बारामती : महान्यूज लाईव्ह
सोयाबीनच्या लिलावात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनचा लिलाव करणाऱ्या कराड येथील व्यापाऱ्याचा परवाना बाजार समितीने शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर रद्द केला आहे.
कराड बाजार समितीतील खरेदीदार व्यापारी राहूल शेवाळे यांनी सोयाबीनच्या लिलावात शासनाच्या हमीभावापेक्षा कमी किंमतीने शेतकऱ्याकडील सोयाबीन खरेदीचा लिलाव केला. त्याची तक्रार सहायक निबंधक व उपनिबंधकांकडे शेतकरी संघटनेचे कराड तालुकाध्यक्ष विनायक जाधव व पुणे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. त्यावरून उपनिबंधकांनी सुनावणी घेत बाजार समितीच्या सचिवांना चौकशीचे व चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते.
व्यापारी शेवाळे यांनी जयदिप संभाजी जाधव व इतर शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन शासनाचा हमीभाव ३८८० रुपये व बोनस १७० रुपये असे ४ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल असताना ३६०० रुपयांप्रमाणे लिलाव होतील असे स्पष्ट केले. व तशीच खरेदी सुरू असल्याचे कळवले. यासंदर्भात संबंधित व्यापाऱ्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले होते. त्याची गंभीर दखल सहायक निबंधकांनी घेत बाजार समितीला आदेश दिले. त्यानंतर बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला.










