पतीच्या खांद्याला खांदा लावून मोलमजुरी, भांडी विक्री आणि मसाले विकून संसाराचा गाडा हाकला; एका मुलाची सैन्यात निवड, तर दोघांनी उच्च शिक्षणाच्या जोरावर गाठले यशाचे शिखर
भवानीनगर : प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शिक्षणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही कष्ट, जिद्द आणि त्यागाच्या जोरावर आपल्या तीन मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला यशाची दिशा देणाऱ्या सणसर येथील गंगुबाई धनंजय चव्हाण यांच्या मातृत्वाचा आणि संघर्षमय जीवनप्रवासाचा आझाद तरुण मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षानुवर्षे कष्ट करताना मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या गंगुबाई चव्हाण यांचा ‘आदर्श माता’ म्हणून फेटा बांधून, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
गंगुबाई चव्हाण यांनी आर्थिक अडचणींवर मात करत आपल्या तिन्ही मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या थोरल्या मुलाने एम.ए. शिक्षणासोबत SET आणि NET परीक्षा उत्तीर्ण केल्या. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पाटबंधारे खात्याची परीक्षा उत्तीर्ण करून सध्या पुणे येथील सिंचन भवनमध्ये पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
दुसरा मुलगा रुपेश चव्हाण हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात भरती झाला आणि त्याने देशसेवा केली. तर तिसरा मुलगा डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी.पर्यंत उच्च शिक्षण घेतले. त्यांचे पीएच.डी.चे शिक्षण पुणे विद्यापीठ तसेच जर्मनी येथे झाले आहे. सध्या ते रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील मुंडे कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संशोधन क्षेत्रात त्यांनी विविध शोध निबंध व पुस्तके लिहिली असून, त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारा खर्च भागविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, गंगुबाई चव्हाण यांनी परिस्थितीसमोर हार न मानता पतीच्या साथीने कष्ट आणि चिकाटीने कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या त्यागामुळे तिन्ही मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मुलांचे विवाह करून त्यांचा संसार उभा केल्यानंतरही चव्हाण कुटुंबाचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास सुरू राहिला.
यावेळी आझाद तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शिंदे, अध्यक्ष संजय शिंदे, धनंजय चव्हाण, रुपेश चव्हाण, ज्ञानेश्वर नलवडे, नंदकुमार चांदगुडे, सणसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक सोमनाथ उर्फ पिंटू गुप्ते, ग्रामपंचायत सणसरचे माजी सदस्य शरद कांबळे, लेखक-कवी बापूराव घाडगे, आण्णा रायते, स्वप्निल शिंदे, अक्षय शिर्के, गणेश जाधव, प्रज्योत शिंदे, आनंद गाडे, साहिल निंबाळकर, योगीराज गाडे, निखिल कोकाटे, अक्षय कांगळे यांच्यासह मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची ४० वर्षांची परंपरा
आझाद तरुण मंडळ, सणसर हे गेल्या ४० वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मंडळाच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा वै. ह. भ.प. गणपत बुवा काळे महाराज यांच्या शुभहस्ते झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या लोकमान्य महोत्सवांतर्गत मंडळाला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक, २५ हजार रुपये रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.
तसेच पुणे जिल्हा तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक, वालचंदनगर पोलीस ठाण्याचा सहा वेळा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि दैनिक लोकमतचा गणनायक पुरस्कारही मंडळाला मिळाला आहे.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी सन्मान करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. याच सामाजिक बांधिलकीतून यंदा गंगुबाई चव्हाण यांच्या संघर्षमय जीवनकार्याची दखल घेऊन त्यांचा आदर्श माता म्हणून गौरव करण्यात आला. कष्टकरी मातांच्या त्यागाचा सन्मान आणि समाजातील इतरांना प्रेरणा देण्याचा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.










