काका यादव भवानीनगर : गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत राउंड जवळ बाळगून फिरणाऱ्या तरुणाला वालचंदनगर पोलिसांनी जेरबंद केले. चेतन राजू लोंढे (वय २०, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत राउंड जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगार व संशयितांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांकडून परिसरात गस्त तसेच संशयित व्यक्तींची तपासणी केली जात होती.
१९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश काटकर व पोलीस नाईक गणेश झरेकर हे पेट्रोलिंग करत असताना इंदापूर–बारामती रोडलगत बेलवाडी फाटा परिसरात पांढरा शर्ट व काळी पँट परिधान केलेला एक इसम कमरेला पँटमध्ये गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता कमरेला पँटमध्ये लपवून ठेवलेले गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच पँटच्या खिशामध्ये एक जिवंत राउंड आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष दोन्ही वस्तू जप्त केल्या. याप्रकरणी चेतन राजू लोंढे याच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी गणेश काटकर, गणेश झरेकर, किर्तीलाल गायकवाड, अमोल गायकवाड, पोलिस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अमिजीत कळसकर, अजित राजुत यांनी कारवाईत सहभाग घेतला.










