ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुणेकरांशी पुन्हा एकदा रंगणार संवाद
पुणे : ग्रामीण महाराष्ट्रातील कष्ट, कौशल्य, सर्जनशीलता आणि संस्कृतीला शहरी बाजारपेठेची व्यापक दारे खुली करून देणारी लोकप्रिय भीमथडी जत्रा यंदा आपल्या २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) बारामती संचलित शारदा महिला संघ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ही जत्रा १६ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत पुण्यातील कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर, शिवाजीनगर येथे भरणार आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पुणेकरांना या ग्रामीण वैभवाचा अनुभव घेता येणार आहे.
ग्रामीण संस्कृती आणि शहरी समाज यांच्यातील संवादाचे प्रभावी व्यासपीठ म्हणून गेल्या दोन दशकांत भीमथडी जत्रेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या परंपरेत जत्रेला केवळ खरेदी-विक्रीचे महत्त्व नसून ती आनंद, उत्साह, लोककला, खाद्यसंस्कृती, सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र मानली जाते. याच परंपरेला आधुनिक बाजारपेठेची जोड देत भीमथडी जत्रेने ग्रामीण भागातील महिला बचत गट, कारागीर, कलाकार, शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना ग्राहकांशी थेट जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
गेल्या १९ वर्षांत पुणेकरांनी भीमथडी जत्रेला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाची मोठी पावती मानली जाते. ग्रामीण महिलांनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंना शहरी ग्राहकांनी पसंती दिली आणि त्यातून अनेक महिला बचत गटांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले. घराच्या चौकटीत राहून पारंपरिक कौशल्य जपणाऱ्या महिलांना स्वतःच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली. अनेक महिलांनी या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळवला. त्यामुळे भीमथडी जत्रा ही केवळ पाच दिवसांची बाजारपेठ नसून ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची आणि उद्योजकतेची चळवळ म्हणूनही पाहिली जाते.
आयोजक सुनंदा पवार यांच्या कल्पक, कृतीशील आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनातून भीमथडी जत्रेने गेल्या दोन दशकांत मोठी वाटचाल केली आहे. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कष्टाला योग्य दाद मिळावी, त्यांना ग्राहकांशी थेट संवाद साधता यावा आणि ग्रामीण भागातील पारंपरिक कला, खाद्यपदार्थ व हस्तकलेला व्यापक व्यासपीठ मिळावे, या उद्देशातून या उपक्रमाचा विस्तार होत गेला. त्यामुळे आज भीमथडी जत्रेची ओळख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ग्रामीण उत्पादनांच्या प्रदर्शनांपैकी एक म्हणून निर्माण झाली आहे.
२० व्या वर्षाचे विशेष आकर्षण
यंदाची भीमथडी जत्रा ही दोन दशकांच्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक ठरणार असून ‘२०’ हा आकडा केंद्रस्थानी ठेवून भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. गेल्या २० वर्षांच्या आठवणी, यशस्वी प्रयोग आणि ग्रामीण महिलांच्या बदललेल्या जीवनाचा प्रवास या जत्रेतून अधोरेखित होणार आहे. दोन दशकांच्या या वाटचालीचा उत्सव साजरा करताना यंदा नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करणाऱ्या महिला बचत गटांचा विशेष सहभाग राहणार आहे.
जत्रेत महाराष्ट्रातील विविध भागांतील महिला बचत गटांची उत्पादने, कृषी उत्पादने, हस्तकला वस्तू, आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, पारंपरिक ग्रामीण साहित्य आणि अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसोबतच ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध भागांची संस्कृती, कला आणि खाद्यपरंपरेचा अनुभव एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि त्यांच्या कष्टाला ग्राहकांची दाद मिळवून देण्याचे काम भीमथडी जत्रेने केले आहे. त्यामुळे जत्रेची २० वर्षांची वाटचाल ही केवळ एका प्रदर्शनाच्या यशाची कहाणी नसून महिला सक्षमीकरण, ग्रामीण उद्योजकता आणि लोकसंस्कृतीच्या संवर्धनाची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.
यंदाच्या २० व्या भीमथडी जत्रेलाही महाराष्ट्रासह पुणेकर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजक सुनंदा पवार यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील मेहनती हातांनी निर्माण केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देतानाच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने जत्रेला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










