बारामती : बारामती न्यायालयात शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल आणि दाखलपूर्व अशी एकूण ५ हजार ६२७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून ६ कोटी ४४ लाख ६२ हजार ६२३ रुपयांची वसुली करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. सी. बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली विधी सेवा समिती आणि बारामती वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत पार पडली.
या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. सी. बर्डे, जिल्हा न्यायाधीश-४ एच. ए. वाणी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. एस. झंवर, चौथे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. एम. पाटील, तसेच दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. पी. काळे आणि तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. व्ही. देशमुख यांनी पॅनेल जज म्हणून काम पाहिले.
मोटार वाहन अपघातातील १९ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. या प्रकरणांतील पक्षकारांना एकूण २ कोटी ५३ लाख ७० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली. यावेळी विमा कंपन्यांच्या वतीने ॲड. सुवर्णा संतीकर, ॲड. भोई, तर पक्षकारांच्या वतीने ॲड. अजय खोमणे, ॲड. अक्षय महामुनी, ॲड. अभी देशमुख, ॲड. खांडेकर, ॲड. फुलारी, ॲड. वाघ, ॲड. चौगुले आदी उपस्थित होते.
लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव स्नेहा मखरे, खजिनदार हर्षद टिकोटे आणि सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मिलिंद देऊळगावकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. याशिवाय न्यायालयीन कर्मचारी, महावितरण, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, नगरपरिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पुढील राष्ट्रीय लोकअदालत १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीच्या माध्यमातून आपली प्रकरणे निकाली काढून मानसिक त्रास कमी करावा आणि त्वरित न्यायालयीन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. सी. बर्डे यांनी केले.










