बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील मेडद येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास तालुका पोलिसांनी
गणेश काशीद (रा. मेडद) यास पिस्तुल व तीन काडतुसांसह अटक केली.
या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश लंगोटे व त्यांच्या पथकासह त्यांनी पाळत ठेवून कारवाईचे आदेश दिले. यावरून या पथकाने दोन दिवस वेषांतर करून गणेश काशीद च्यावरती पाळत ठेवली.
गणेश काशीद हा गावातील भैरवनाथ पेट्रोल पंपा समोर आल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पथक पोहोचले, मात्र पथकाची चाहूल लागताच त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास पथकाने पाठलाग करून पकडले व त्यांची अंगझडती घेतली. त्यामध्ये त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याचा परवाना नसल्याचे आढळल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, सहाय्यक फौजदार दिलीप सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे, प्रशांत राऊत, संतोष खैरे यांनी सहभाग घेतला.










