बारामती : महान्यूज लाईव्ह
तब्बल आठ महिन्यानंतर कोरोनाचा आलेख उतरतोय हा दिलासा एकीकडे आणि साडेतीन महिन्यात फक्त कोरोनाचा आजार झालेल्यांनी शंभरी ओलांडली हे दुःख दुसरीकडे अशी बारामतीची कोरोनाची स्थिती आहे. अर्थात हा आकडा १०२ दिसत असला तरी सारी संशयितांचा आकडा त्यात मिळवलेला नाही आणि बारामतीतून पुण्यात, पिंपरीमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर तेथे मृत्यू झालेल्यांची आकडेवारीही त्यामध्ये नाही. ही आकडेवारी ऐकल्यास थरकाप उडेल.
कोरोनाने बारामती तालुक्याचे किती आर्थिक नुकसान केले यापेक्षाही सामाजिक नुकसान खूप केले आहे. आतापर्यंत १५० हून अधिक जणांचा बळी या कोरोना आणि सारीने घेतला. सहव्याधी असलेल्यांचे आयुष्यच या कोरोनाने संपवले. कोठे सख्खे भाऊ तर कोठे पतीपत्नी, कोठे बापलेकांचा बळी या कोरोनाने घेऊन हसतेखेळते घर उध्वस्त केले. कोठे दररोज हसतमुख भेटणाऱ्या व्यापाऱ्याचा बळी घेतला, कोठे गर्भश्रीमंतांचा तर कोठे कोणाच्याही अध्यात मध्यात आणि माहितीतही नसणाऱ्या गरीबाचा देखील बळी या कोरोनाने घेतला. कोरोनाने यात कोठे मतभेद केलाच नाही.
यामुळेच कदाचित कोरोनाच्या काळात माणूसकीच्या भिंतीही उभ्या राहील्या. शेजारच्या गावातील, शेजारच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील रुग्णासाठी रेमीडिसीव्हर इंजेक्शनपासून प्लाझ्मा पर्यंत उपचार मिळण्यासाठी बारामती तालुक्यातून संवेदनशील दात्यांची भिंत उभी राहीली. बाहेरच्या तालुक्या, जिल्ह्यातील रुग्णांसाठी येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टिम रात्रंदिवस राबत राहीली. एकीकडे दररोज स्मशानात मृतदेहांची रांग व अंत्यविधीसाठी प्रतिक्षेतील मृतदेह पाहिले, तर कोठे त्याच संख्येने कोरोनावर मात करणारे २ वर्षापासून ९२ वर्षांपर्यंतचे रुग्णही या बारामतीने पाहिले.
कोरोना आजही बळी घेतोय.. दररोज एक-दोन जण हे जग सोडून जात आहेत. मात्र आता कोरोना रोखण्यासाठी झालेली जनजागृती देखील कोरोनाचा प्रसार काहीसा कमी करण्यासाठी मदतीची ठरली आहे. मात्र संकट संपलेले नाही. अजूनही हे संकट घोंगावते आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही काळजी घ्यावी, आपली घ्यावी आणि आपल्या घरातील सहव्याधी असलेल्या प्रिय व्यक्तींची..!










